उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मागणी मान्य; विमा संरक्षण आणि कोविड नुकसान भरपाई देण्याचेही आश्वासन

करोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील विविध घाऊक बाजार समितीत जीवनावश्यक वस्तूंच्या चढ-उताराचे काम करणारे माथाडी कामगार आणि या समित्यांना सुरक्षा देणाऱ्या सुरक्षा रक्षकांचा जीवनावश्यक सेवेत समावेश करण्यात यावी, तसेच त्यांना कोविड १९ अंर्तगत भरपाई आणि विमा कवच देण्यात यावे ही माथाडी संघटनेची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्य केली आहे.

देशात २५ मार्च पासून टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्या अगोदर सात दिवसांपासून राज्य सरकारने संचारबंदी जाहीर केली होती. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या सर्व घाऊक बाजारपेठा सुरू ठेवल्या जातील असे सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे टाळेबंदीत घाऊक बाजारपेठा आणि त्या ठिकाणी शेतमालाची चढउतार करणारे माथाडी आणि मापाडी, वारणार तसेच सुरक्षा रक्षक कार्यरत होते. टाळेबंदीच्या दुसऱ्या टप्यात जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूकीला सरकारने मुभा दिल्याने रेल्वेने येणारी खते, अन्न धान्य तसेच सिलिंडर यांची चढ-उतार हा माथाडी कामगार करीत आहे.

डॉक्टर, पोलिसांप्रमाणेच पहिल्या दिवसापासून कार्यरत असलेल्या माथाडी आणि सुरक्षा रक्षकांना जीवनावश्यक सेवेत सामावून घेताना विमा कवच आणि मृत्यू झाल्यास भरपाई देण्याची मागणी राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट, आणि जनरल कामगार युनियनेने शासनाकडे केली होती मात्र त्याची दखल घेतली गेली नाही.

या कामगारांना कामावर जाण्यासाठी रेल्वेचा उपयोग करून दिला जात नाही. त्यामुळे संघटनेचे नेते नरेंद्र पाटील यांनी वाशी येथे एक दिवस धरणे आंदोलन केले होते. माथाडी कामगारांचा पहिल्यापासून पाठीराखे असलेल्या राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी या संघटनेचे नेते पाटील व आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह बैठक आयोजित केली होती.यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील आणि अनेक उच्च अधिकारी उपस्थित होते. जीव धोक्यात घालून सेवा देणारे माथाडी कामगार व सुरक्षा रक्षक यांना विमा कवच आणि नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन पवार यांनी दिल्याचे संघटनेने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.