News Flash

सण नारली पुनवेचा..

शुक्रवारी दिवसभर जेटीचा परिसर सजवण्यासाठी खाडीकिनारी कोळी बांधवांची लगबग सुरू होती.

(संग्रहित छायाचित्र)

नारळीपौर्णिमेसाठी नवी मुंबईतील कोळीवाडे सजले

नारळीपौर्णिमेच्या सणासाठी नवी मुंबई आणि परिसरातील कोळीवाडे आणि ठिकठिकाणच्या मासेमारी जेट्टी सजल्या आहेत. शासनाने खोल समुद्रातील मासेमारीवरील बंदी १ ऑगस्टलाच उठवली असली; तरी नवी मुंबई आणि उरण परिसरातील अनेक मच्छीमार नारळीपौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करूनच मासेमारी सुरू करतात. त्यामुळे सध्या दिवाळे, वाशी, करावे, नेरुळ, सारसोळे, वाशी, बोनकोडे,घणसोली, ऐरोली, दिवा भागात या सणाची जोरदार तयारी सुरू आहे.

शुक्रवारी दिवसभर जेटीचा परिसर सजवण्यासाठी खाडीकिनारी कोळी बांधवांची लगबग सुरू होती. दिवाळे, सारसोळेसह विविध ठिकाणच्या खाडीकिनारी पताका लावून सजावट करण्यात आली होती. दिवाळे गाव येथील ‘सिद्धी ग्रुप’, सारसोळे गाव येथील ‘सारसोळे ग्रामस्थ’ तसेच वाशी गाव येथील ‘डोलकर मित्र मंडळा’ने नारळीपौर्णिमेची तयारी सुरू केली आहे. बँडच्या तालावर नारळाची गावागावांतून वाजतगाजत मिरवणूक काढली जाणार आहे.

सारसोळे गावात अनेक वर्ष ‘कोलवाणी माता मित्रमंडळा’च्या वतीने नारळीपौर्णिमेचा सण साजरा केला जात होता. यंदा प्रथमच सर्व ग्रामस्थांनी मिळून हा सण साजरा करण्याचा निर्धार केला आहे. दर्याला शांत करण्यासाठी परंपरेप्रमाणे सोन्याचा नारळ अर्पण करून मासेमारी करण्यासाठी बळ दे, असे साकडे घातले जाणार असल्याची माहिती कोळी बांधवांनी दिली.

सकाळी १० ते १ या वेळात सारसोळे गाव येथील मंदिरापासून वाजतगाजत जेटीपर्यंत जाणार आहोत. यात सर्वच आबालवृद्ध पारंपरिक वेशात सहभागी होतील. त्यानंतर पालखी होडीद्वारे समुद्रात नेली जाईल. तिथे सागराला नारळ अर्पण करू आणि दर्या देवाला साकडे घालू.    – मनोज मेहेर, सारसोळे ग्रामस्थ.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 3:07 am

Web Title: koliwade in navi mumbai for naraali purnima
Next Stories
1 तुर्भेतील खड्डय़ांचा वाहतुकीत अडथळा
2 कुंदन, मोत्यांच्या राख्यांना मोठी मागणी
3 ‘बिद्रे हत्याकांडप्रकरणी आणखी पुरावे द्या’
Just Now!
X