नवी मुंबई शहरात करोनाचा कहर सुरुच असून दररोज करोना रुग्णसंख्येत भर पडत असल्याने  पुन्हा लॉकडाउन होणार का याबाबत नागरीकांमध्ये उत्सुकता होती. शहरात आतापर्यंत एकूण १५ हजार ३८५ करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत तर ४१८ जणांचा मृत्यू झाला आहे. पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहरात पुन्हा एकदा ४६ प्रतिबंधित क्षेत्रात ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी व्यवहार नियमित सुरु राहतील असे आदेशित करण्यात आले आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात यापूर्वी ३ जुलैच्या मध्यरात्रीपासून १३ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत १० दिवसाचा लॉकडाउन घेण्यात आला होता. त्यानंतर आठ दिवसानी टाळेबंदी वाढवून ती १९ जुलैपर्यंत करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा  शहरात फक्त प्रतिबंधित क्षेत्रातच लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे.  शहरातील ४६ प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणचे व्यवहार सुरळीत होणार आहेत.

शहरात राज्य शासनाने जाहीर करण्यात आल्याप्रमाणे मिशन बिगिन अगेन ३ प्रमाणे मॉल्स, मार्केट व कॉम्प्लेक्समधील दुकाने  सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत समविषम पद्दतीने दुकाने सुरु राहणार आहेत. पण मॉलमधील उपहारगृहे व चित्रपटगृहे बंदच राहणार आहेत.

नवी मुंबई शहरात करोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता लॉकडाउन न करता फक्त प्रतिबंधित क्षेत्रातच ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन असणार आहे. नागरिकांनी नियमात राहून पालिकेला सहकार्य करावे असं आवाहन पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केलं आहे.