नवी मुंबई, पनवेलमध्ये आज मध्यरात्रीपासून निर्बंध; किराणा, अत्यावश्यक सेवा सुरूच

नवी मुंबई/पनवेल : नवी मुंबई आणि पनवेल पालिका क्षेत्रात शुक्रवार, ३ जुलैच्या मध्यरात्रीपासून १३ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत दहा दिवसांची टाळेबंदी लागू होणार आहे. या काळात दोन्ही पालिका हद्दीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहारांवर बंदी घालण्यात आली आहे. या वेळी नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडता येणार नसल्याचे पालिकांनी जारी केलेल्या परिपत्रकांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. करोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी स्वत:ची आणि इतरांची काळजी घेण्यावर अधिक भर द्यावा, अशी अपेक्षा पालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे.

नवी मुंबई पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ आणि पनवेल पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी ही घोषणा केली.  टाळेबंदीच्या काळात दोन्ही पालिका क्षेत्रातील एमआयडीसीतील अत्यावश्यक सेवेतील उत्पादन तयार करणारे कारखाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच वेळी वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याची मागणी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केली आहे.

नवी मुंबई

हे सुरू

* जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, बेकरी, किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने सकाळी ९ ते ५ या वेळेत सुरू राहतील.

* दूध विक्री सकाळी ५ ते १० या वेळेत सुरू.

* औषधे, अत्यावश्यक, नाशवंत वस्तूंची ने-आण करता येईल.

* अत्यावश्यक सेवेसाठीची

उपनगरी रेल्वेसेवा सुरू राहील.

* अत्यावश्यक सेवेसाठी परवानगी असलेल्यांना घराबाहेर पडता येईल.

* बँक, एटीएम आणि विमासंबंधी बाबी, वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या सुरू राहतील.

* पेट्रोल पंपावर अत्यावश्यक सेवेतील पासधारकांसाठी इंधन.

* ऑनलाइन मद्यविक्रीस परवानगी

हे बंद

* अत्यावश्यक सेवेत नसतील त्या सर्व आस्थापना बंद राहतील.

* सरकारी कार्यालये या कालावधीत कर्मचाऱ्यांसह काटेकोर पालन करून सुरू राहतील. परंतु इतरांना घराबाहेर पडता येणार नाही.

* अत्यावश्यक खरेदीसाठी ५ पेक्षा जास्त नागरिक एकत्र येणार नाहीत.

* नवी मुंबईतील सर्व गाव गावठाणे, विविध नोड यांबरोबर एमआयडीसी क्षेत्रातील गाव गावठाणे येथील व्यवहारही बंद राहतील.

* टॅक्सी, रिक्षा बंद.

पनवेल

हे सुरू

* शुक्रवार, ३ जुलै रोजी रात्री ९ वाजल्यापासून ते १३ जुलैच्या रात्रीपर्यंत पनवेल पालिका क्षेत्रात टाळेबंदी लागू असेल.

* या काळात रुग्णांना सेवा देणारे वैद्यकीय व्यवसाय, औषध दुकाने, किराणा मालाची दुकाने, दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीला सूट असेल.

* अत्यावश्यक कामे आणि रुग्णसेवा देण्यासाठी नागरिकांना घराबाहेर पडता येईल.

* तळोजा औद्योगिक वसाहतीतील अत्यावश्यक सेवा साहित्य पुरविणारे कारखाने सुरू राहतील.

* अत्यावश्यक सेवेतील रुग्णालये, औषधांची दूकाने २४ तास खुली

* किराणा मालाची दुकाने सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत खुली राहतील.

* दूध व दुग्धजन्य पदार्थासाठी सकाळी पाच ते सायंकाळी पाचपर्यंत सुरू राहतील.

* तीन आसनी रिक्षातून एकाच प्रवाशास परवानगी. चारचाकीत चालकासहित दोन प्रवासी.

हे बंद

* घरापासून दोन किलोमीटर अंतराहून अधिक प्रवास केल्यास वाहन जप्त.

* कारणाशिवाय भटकंती आणि गर्दी करणाऱ्यांना अटकाव, नियमभंग केल्यास कठोर कारवाई.अत्यावश्यक सेवा वगळता इतर उत्पादन घेणारे कारखाने बंद. केशकर्तनालय, सौंदर्य संवर्धनगृह बंद राहतील.