नियंत्रण पुन्हा व्यवस्थापनाकडे; अंतराच्या नियमांची पायमल्ली, शेतमालाच्या गाडय़ांना अमर्याद प्रवेश

नवी मुंबई</strong> : मुंबई कृषी उत्पन्न बाजारात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अंतराच्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर व्यवस्थापनाने भर दिला आहे. मात्र, नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याला करोनाची लागण झाली. त्यानंतर त्याच्या गैरहजेरीत, बाजार समिती आवारात गाडय़ांच्या प्रवेशावर कोणतीही मर्यादा घालण्यात आली नाही. याशिवाय अंतराच्या नियमांचीही पायमल्ली करण्यात आली. याशिवाय रिक्षांना प्रवेश देण्यात येत होता. तसेच टोकण पद्धतीत साटेलोटे करीत अनागोंदी माजवल्याचा दावा एपीएमसी सचिवांनी केला आहे. त्यामुळे बाजारातील सर्व व्यवहार पुन्हा व्यवस्थापनाने स्वत:कडे घेण्याचा निर्णय घेतल्याचे सचिव अनिल चव्हाण यांनी सांगितले.

नवी मुंबई शहरात करोना संसर्ग वाढीचा उगम ‘एपीएमसी’ बाजार मानले जात होते. आजही एपीएमसीतील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. बाजारात दाखल होणाऱ्या शेतमालाच्या गाडय़ांची वाहूतक मर्यादित ठेवण्यात आली होती. याशिवाय टोकण पद्धतीने मर्यादित मालाची आवक सुरू ठेवण्यात आली. यासाठी एपीएमसी व्यवस्थापनाच्या वतीने टोकण दिले जात होते. मात्र, कोविड काळात संबंधित उपसचिव यांच्याकडे बाजारातील कोविड अनुषंगाने नियम पालन जबाबदारी सोपविण्यात आलेली होती. मात्र महिन्याभरापासून संबंधित अधिकाऱ्यांना बाधा झाल्याने त्यांना विश्रांतीसाठी घरी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर हे काम इतर अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले होते. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी भाजीपाला बाजारातील संबंधित संघटनांकडे टोकण पद्धतीची जबाबदारी दिली. त्यामुळे बाजारात  वाहनांच्या संख्येवर कोणतेही नियंत्रण ठेवण्यात न आल्याने अंतराच्या नियमाचा फज्जा उडाल्याचे स्पष्ट झाले.

‘कारवाईत भेदभाव नाही’

टाळेबंदीत बाजारात किरकोळ विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. यात दहा किलोवर भाजी विक्रीस परवानगी देण्यात आली होती. मात्र, किरकोळ विक्री कारवाईत भेदभाव होत असल्याचा आरोप काही व्यापाऱ्यांनी केला आहे. मात्र, एपीएमसी उपसचिव सुनील सिंगतकर यांनी समसमान किरकोळ विक्रीवर कारवाई केल्याचे मत व्यक्त केले आहे. आजवर १५० जणांवर प्रत्येकी एक हजार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दीड लाख रुपये वसूल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

टोकण पद्धत बंद करण्याची मागणी

क्रांतिसिंह नाना पाटील घाऊकभाजीपाला व्यापारी महासंघाच्या वतीने टोकण पद्धती बंद करावी, तसेच वेळ पूर्वीप्रमाणे पहाटे ३ ते दुपारी १२ वाजेपर्यंत करण्यात यावी, बाजारातील तीन क्रमांकाच्या बाजाराचे प्रवेशद्वार पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. सध्या बाजारातील आवक आणि जावक प्रवेशद्वार सुरू आहे. भाजी बाजार प्रतिबंधित क्षेत्र नाही. या आवारातील गर्दी टाळण्यासाठी सर्व प्रवेशद्वारे खुली करावीत, असे महासंघाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

रोज ३२५ गाडय़ा

श्रावणात शाकाहारावर भर देतात. त्यामुळे भाजीपाल्याची मागणी वाढते. त्यामुळे भाजीपाला बाजारात २५० ते ३०० गाडय़ांची मर्यादा वाढवून ३२५ गाडय़ांना प्रेवश देण्यात येणार आहे.