बंद’ नसल्याने शहरातील व्यवहार सुरळीत; शाळा, महाविद्यालयांना सुटी

सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदमध्ये नवी मुंबई सहभागी होणार नसल्याची घोषणा आधीच करण्यात आली असली, तरी २५ जुलैला झालेल्या हिंसाचाराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी गुरुवारी नवी मुंबई आणि परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. शाळा, महाविद्यालये, बाजार बंद असल्यामुळे आणि एनएमएमटीच्या बसगाडय़ाही कमी प्रमाणात सोडण्यात आल्यामुळे रस्ते मोकळे होते.

मराठा समाजाने आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी राज्यभर मोर्चा काढला त्याला ९ ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण झाले. त्या पाश्र्वभूमीवर गुरुवारी बंदची हाक देण्यात आली होती. यापूर्वी २५ जुलैला झालेल्या आंदोलनाला कळंबोली आणि कोपरखैरणेत हिंसक वळण लागले होते. प्रचंड जाळपोळ आणि दगडफेक झाली होती. कोपरखैरणेत दोन गटांत झालेल्या मारामारीत एका युवकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे कोपरखैरणेत अनेक दिवस तणाव होता. स्थानिक विरुद्ध मराठा असा वाद पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे परिस्थिती कौशल्याने हाताळण्यासाठी पोलिसांनी सर्व बंदोबस्त केला होता. कोपरखैरणे नोडमध्ये सर्वाधिक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ठाणे-बेलापूर आणि शीव-पनवेल महामार्गावरही पोलिसांची करडी नजर होती. सकाळपासून शहरातील जवळपास सर्वच मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

रात्रीपासून बंदोबस्त असून कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. नागरिकांनी खासकरून आंदोलकांनी मोलाचे सहकार्य केले. ज्यांनी बंदचा निर्णय घेतला होता, त्यांनीही अनुचित प्रकार केला नाही. रात्रीही बंदोबस्त ठेवण्यात येईल.

– डॉ. सुधाकर पठारे, उपायुक्त, परिमंडळ १