विकास महाडिक

नवी मुंबई विमानतळ परिघात केंद्रीय विमान प्राधिकरणाने घातलेली उंचीची अट काही ठिकाणी काही प्रमाणात शिथिल केली आहे. त्यामुळे सिडकोच्या महामुंबईतील ९० हजार घरांच्या महागृहनिर्मितीत आणखी ३७६ घरांची भर पडली आहे.

सिडकोने नवी मुंबईतील रेल्वे स्थानक व ट्रक टर्मिनल्सबाहेरील पाìकगच्या जागांवर ‘ट्रान्सझिट ओरिएन्टेड डेव्हलपमेंट’ अंतर्गत परवडणारी घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी खारघर, बामणडोंगरी, खारकोपर, तळोजा येथे भूखंड निश्चित करण्यात आले आहेत. या महागृहनिर्मितीची निविदा प्रक्रिया सध्या सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील सुमारे २२ हजार घरांच्या बांधकामात शापूरजी पालनजी, एल अ‍ॅण्ड टी, बी. जी. शिर्के यासारख्या अग्रगण्य बांधकाम कंपन्यांनी रस दाखविला आहे. पाच जुलै रोजी उघडण्यात येणारी ही निविदा काही फेरबदलामुळे १३ दिवस पुढे ढकलण्यात आली होती. ती आणखी पाच दिवस वाढवून देण्यात आलेले आहेत.  नवी मुंबई विमानतळाला केंद्रीय विमान प्राधिकरणाने परवानगी देताना धावपट्टीच्या वीस किलोमीटर परिघात ५० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या इमारती बांधण्यास मज्जाव केला आहे. या भागाला उड्डाण क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक विकासकांना त्यांच्या इमारतींचा प्रस्तावित आराखडा बदलण्याची वेळ आली आहे.

मात्र सिडकोच्या घरांच्या उंचीची मर्यादा काही भागांत शिथिल केल्याने तळोजा, खारघर भागात आता १५ मजली इमारतीऐवजी आता १६ मजली इमारती या ठिकाणी उभ्या राहू शकणार आहेत. त्यामुळे घरांच्या एकूण संख्येत वाढ झाली असून ही संख्या ९० हजार १४७ होणार आहे.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात अर्ज विक्री?

सिडकोने गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी १४ हजार ७३८ घरांची अर्ज विक्री सुरू केली होती. त्यामुळे यंदा त्याच दिवशी ९० हजार घरांच्या महागृहनिर्मितीची अर्ज विक्री करण्याची योजना व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी आखली होती. पण अचानक वाढलेली घरांची संख्या आणि निविदाकारांनी त्यासाठी मागितलेला वेळ यामुळे ही अर्ज विक्री आता लांबणीवर पडली आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सिडकोच्या या गृहनिर्मितीतील घरांच्या विक्रीचा धमाका सरकारला करायचा आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात सर्व सोपस्कर पूर्ण करून संचालक मंडळाच्या मंजुरीनंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात ही विक्री सुरू करण्यात येईल, असा अंदाज आहे.

विमानतळाच्या उड्डाण क्षेत्रातील इमारत उंची मर्यादा शिथिल झाल्याने काही भागांत गृहनिर्मितीची संख्या वाढणार आहे. त्यामुळे निविदाकारांना आणखी वेळ देण्यात आला आहे. या वाढत्या गृहसंख्येमुळे सर्वसामान्यांचा फायदा होणार आहे.

-एस. के. चौटालिया, मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) सिडको