|| संतोष जाधव

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका सदस्यांचे ‘कार्यदर्शन’

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या सहाव्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वत:च्या प्रभागातील जास्तीत कामांचा शुभारंभ करण्याचा प्रयत्न पालिका सदस्यांकडून सुरू आहे. सुट्टीच्या दिवशी शहरात भूमिपूजनांचा धडाका पाहायला मिळत आहे.

पालिका निवडणुकीत बहुसदस्यीय पद्धत रद्द करण्याचा निर्णय झाल्यानंतर  नगरसेवकांनी विविध कामांचा श्रीगणेशा केला. गेल्या पाच वर्षांत ठरावीक कामांचेच उद्घाटन सदस्यांकडून केले जात होते. मात्र आता निवडणुका जवळ आल्याने प्रभागातील छोटय़ा कामांचाही भूमिपूजन सोहळा पार पाडला जात आहे. भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने प्रभागातील नागरिकांना निमंत्रित केले जात आहे. त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मतदारराजाला मानसन्मानाचे श्रीफळ दिले जात आहे. शहरात विविध पक्षांनी महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून शहरात १११ प्रभागांमध्ये सध्या सोहळ्यांचे चित्र पाहायला मिळत आहे. आरक्षण सोडत झाल्यानंतर या भूमिपूजन सोहळ्यांना आणखी गती येण्याची शक्यता आहे.

अनेकांनी स्वत:च्याच पदरात उमेदवारी पाडून घेण्यासाठी प्रभागातील नागरिकांना देवदर्शन वारी काढण्यास सुरुवात केली आहे. पालिकेकडून प्रभागांचा प्रारूप आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. यामुळे येत्या काही दिवसांत आरक्षण सोडत जाहीर होईल. त्यामुळे उरलेल्या दिवसांत आचारसंहितेपूर्वी विविध कामांचा श्रीगणेशा केला जाईल. याच वेळी अनेक कामांची उद्घाटनेही केली जातील, असे एकूण चित्र शहरात विविध ठिकाणी आहे. स्वत:च्या प्रभागातील कामांची छाप मतदारांवर टाकण्यासाठी पुढील काही काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन लोकप्रतिनिधींकडून तसेच निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्यांकडून होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. काहींनी क्रिकेटचे सामने भरविले आहेत. तर कोणी कबड्डीच्या सामन्यांकडे वळला आहे. तर काही ठिकाणी कीर्तन भरविण्यात येत आहेत.

आघाडीकडेही डोळा

नवी मुंबई महापालिकेत एकूण १११ प्रभाग असून त्यामधील सध्या ५५ पुरुष नगरसेवक तर ५६ महिला नगरसेविका आहेत. तीच संख्या आगामी निवडणुकीत राहणार आहे. पुरुषांपेक्षा महिला उमेदवारांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. असे असताना महाविकास आघाडी होणार का, त्यामुळे कोणाला किती फायदा होणार अशी गणिते आखली जात असून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी भूमिपूजनांचे सोहळे रंगू लागले आहेत.