आठ वर्षांनंतर माथाडी कामगाराच्या हत्येचा उलगडा

नवी मुंबई : आठ वर्षांपूर्वी झालेल्या माथाडी कामगाराच्या हत्येचा उलगडा करण्यात नवी मुंबई पोलिसांनी यश आले आहे. जुगारात जिंकलेल्या पैशाच्या वादातून आरोपीने केलेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दोन वेळा तपास बंद केल्यानंतर तिसऱ्यांदा आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दशरथ विठ्ठल कांबळे असे अटक आरोपीचे नाव आहे. २९ डिसेंबर २०१२ रोजी तुर्भे येथील एसटी  स्थानकाजवळ निर्जनस्थळी एक मृतदेह आढळून आला होता. पोलिसांना त्याच्याकडे काही वस्तू आढळून आल्याने त्याची ओळख पटली होती. आनंदा बाबुराव सुकाळे असे मयत व्यक्तीचे नाव होते. शवविच्छेदनमध्ये त्याच्या डोक्यावर जड वस्तू मारल्याने रक्तस्राावाने त्याचा मृत्यू झाल्याचे निदान झाले होते. मात्र या प्रकरणी आरोपीचा शोध लागत नव्हता. १७ ऑगस्ट २०१३ मध्ये तपास बंद करण्यात आला. त्यानंतर पुन्हा पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला, मात्र काहीही हाती न लागल्याने फेब्रुवारी २०१७ मध्ये पुन्हा तपास थांबवण्यात आला होता.

गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ. बीजी शेखर पाटील यांनी आव्हान म्हणून हा तपास सुरू केला होता. यासाठी उपायुक्त प्रवीण कुमार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, गिरीधर गोरे , साहाय्य्क पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचे पथक नेमण्यात आले होते. तपासात आरोपी कांबळे याच्याबाबत काही माहिती हाती आल्यानंतर त्याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्हा कबुल केला.

एपीएमसी परिसरात आरोपी कांबळे याची माथाडी कामगारांत दहशद असल्याचे समोर आले होते. त्याच्यावर पोलिसांनी पाळत ठेवली. त्या वेळी एका खबरीने दिलेल्या माहितीनुसार एका रिक्षाचालकाला आरोपी कांबळे नेहमी धमकावत असतो अशी माहिती समोर आली. त्यानंतर रिक्षाचालकालाा ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीनुसार आरोपी कांबळे मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास  जात असताना मी त्याला पाहिले होते. कुठे बोलू नये म्हणून तो नेहमी माझ्यावर दबाव टाकतो असे सांगितल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.

हत्येचे कारण

मयत आनंदा सुकाळे याने जुगारात २५ हजार रुपये जिंकले होते. याच पैशासाठी दोघांत वाद झाला. त्या वेळी झालेल्या मारामारीत आरोपी कांबळे याने सुकाळे यांच्या डोक्यात लाकडी प्रहार केला. यात सुकाळे यांचा मृत्यू झाला. आरोपीने मृतदेह तेथेच एका ठिकाणी लपवून त्यावर गवत टाकले. दुसऱ्या दिवशी आरोपीने एका रिक्षात मृतदेह टाकून तुर्भे एसटी डेपोतील एका निर्जन ठिकाणी फेकून दिला होता.

अभिलेखावरील आरोपी

आरोपी कांबळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही जबरी चोरी, दरोडा, चोरी असे गुन्हे दाखल आहेत. त्याला हद्दपारही करण्यात आले होते. मयत सुकाळे हा माथाडी कामगार असल्याने हत्या झाली तेव्हा माथाडी कामगारांच्या सुरक्षा प्रश्नावर एपीएमसीमध्ये तणाव निर्माण झाला होता.