गावडेंच्या खांद्यावर पक्षाची धुरा; उरणचे प्रशांत पाटील निरीक्षक

नवी मुंबई राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांना नाईक कुटुंबाने डांबून ठेवल्याने शनिवारी झालेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील भेटीला केवळ अकरा नगरसेवकांनी हजेरी लावली. या अकरा नगरसेवकातील नेरुळचे अशोक गावडे यांची अपेक्षेप्रमाणे सोमवारी अध्यक्ष पदावर वर्णी लागली आहे. निरीक्षक म्हणून पक्षाचे सरचिटणीस उरणकर प्रशांत पाटील यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली आहे. पाटील हे नाईक यांचे रायगड जिल्ह्य़ातील एकमेव खंदे समर्थक मानले जात होते. राष्ट्रवादीच्या बिगर आगरी नगरसेवकांना संरक्षण देण्याचे काम आगरी-पाटील करणार आहेत.

माजी मंत्री गणेश नाईक यांचा पक्ष प्रवेश तूर्त लांबणीवर पडला असून भाजपाच्या काही नेत्यांच्या तारखांवर तो अवलंबून आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात हा प्रवेश होईल असा अंदाज आहे.

नाईक यांचा भाजपा प्रवेश निश्चित झाल्याने राष्ट्रवादीला लागलेली गळती रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीत राहू इच्छिणाऱ्या नगरसेवकांसाठी त्यांनी शनिवारी दोन तास दिले. पालिका पक्षांतर कायद्यानुसार सर्वच नगरसेवकांनी पक्षांतर केले तर ते  ग्राह ठरणार नसल्याची गुगली देखील पवारांनी टाकली आहे. त्यामुळे नाईक यांच्याबरोबर भाजपात जाणाऱ्या सुमारे चाळीस नगरसेवकांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे.

गणेश नाईक यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे माजी स्थायी समिती सभापती (तीन वेळा ही समिती नाईकांनी दिली आहे) सुरेश कुलकर्णी यांनी नाईकांबरोबर जाण्यास नकार दिला असून राष्ट्रवादीत कायम राहणार असल्याचे जाहीर केल्याने नाईक यांना मोठा धक्का मानला जात आहे. त्या कुलकर्णी यांना पवार यांनी खासगीत कानमंत्र दिल्याचे समजते. त्यामुळे कुलकर्णी कामाला लागले असून राष्ट्रवादीत राहू इच्छिणाऱ्या सहा नगरसेवकांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे नाईक यांनी उभे केलेले कार्यकर्ते नाईक यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. मुस्लीमबहुल असलेल्या प्रभागातील नगरसेवकांनी भाजपा प्रवेशाऐवजी एकवेळ शिवसेनेचा पर्याय निवडणार असल्याचे सांगितले आहे.

नगरसेवकांत संभ्रम

पालिकेतील ११ नगरसेवक पवार यांना शनिवारी मुंबईत भेटायला गेले होते. त्या वेळी पवार यांनी नगरसेवकांच्या मनात एक संभ्रम तयार केला. नगरसेवकांना पक्षांतर करायचे असेल तर सर्वच नगरसेवक म्हणजे ५२ नगरसेवकांना पक्षांतर करावे लागणार आहे. तसे न केल्यास भाजपात जाणारे नगरसेवक अपात्र ठरतील. त्यानंतर सर्वच पक्ष प्रतोद कायद्याची पुस्तके चाळायला लागली आहेत. काही स्थानिक नेत्यांनी तर नवीन आयुक्तांना फोन करून विचारणा केली. त्यामुळे सर्व नगरसेवकांच्यात संभ्रमावस्था वाढली पण पालिकेतील एका उच्च अधिकाऱ्याने या बद्दल स्पष्टीकरण दिले आहे.

असा आहे कायदा

महाराष्ट्र स्थानिक सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ च्या नियमानुसार (त्यात अलीकडे सुधारणा करण्यात आली आहे) दोन तृतीयांश सदस्य हे पक्षांतर करू शकतात. नवी मुंबई पालिकेत राष्ट्रवादीचे ५२ नगरसेवक आहेत. त्यांना प्रथम दोनने गुणल्यावर १०४ सदस्य संख्या येते. या संख्येला तीनने भागल्यानंतर येणारी संख्या ही पक्षांतरासाठी आवश्यक मानली गेली आहे. राष्ट्रवादीच्या ५२ नगरसेवकांपैकी ११ नगरसेवक पवार यांना भेटण्यास अर्थात राष्ट्रवादीत कायम राहण्यास तयार आहेत असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नाईकांबरोबर ४१ नगरसेवक आहेत असे दिसून येते. यातील आणखी तीन चार राष्ट्रवादीत राहिले तरी नाईकांबरोबर जाणाऱ्या नगरसेवकांची संख्या ३५ च्या खाली जात नाही. ती टिकवण्याची जबाबदारी नाईकांवर आहे म्हणूनच तीन नगरसेवकांना शनिवारी रोखून धरण्यात आले होते.