News Flash

विमानतळ ठेकेदार कंपन्यांच्या रक्षणासाठी ४० सशस्त्र जवान

नवी मुंबई विमानतळ उभारणीची पंधरा हजार कोटी रुपये खर्चाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

सिडकोचे ‘फोर्स वन’

जमीन सपाटीकरण करण्याचे काम मिळालेल्या जीव्हीके कंपनी व सिडको अधिकाऱ्यांना विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी दमदाटी करून हुसकावून लावल्यामुळे सिडकोच्या दोन हजार कोटी रुपये खर्चाची कामे करणाऱ्या ठेकेदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या ठेकेदारांनी कामासाठी आणलेल्या करोडो रुपये किमतीच्या यंत्रसामग्रीचे संरक्षण व्हावे आणि काम करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना त्यांना संरक्षण मिळावे यासाठी सिडकोने ४० सशस्त्र जवानांचे एक पथक विमानतळ परिसरात तैनात केले आहे.

नवी मुंबई विमानतळ उभारणीची पंधरा हजार कोटी रुपये खर्चाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तीन आंतरराष्ट्रीय विकासकांना ही निविदा पुस्तिका देण्यात आली असून सप्टेंबर माध्यान्हापर्यंत ते अंतिम आर्थिक बोली भरणार आहेत. एकीकडे ही आर्थिक निविदा प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे सिडकोने जमीन सपाटीकरण, उलवा टेकडी उंची कमी करणे, टाटा उच्चदाबाच्या वाहिन्या स्थलांतरित करणे तसेच उलवा नदीचा प्रवाह वळविणे या कामांच्या १७०० कोटी रुपये खर्चाच्या निविदा काढून वितरित केलेल्या आहेत. त्यातील एक सहाशे कोटींचे काम जीव्हीके या मुंबई विमानतळ आधुनिकीकरण करणाऱ्या कंपनीला मिळाले आहे. हीच कंपनी मुख्य आर्थिक निविदा प्रक्रियेतील तीन बडय़ा कंपन्यांच्या स्पर्धेतदेखील सहभागी आहे. विमानतळपूर्व काम मिळाल्याने काही दिवसांपूर्वी जीव्हीके कंपनीने पुढील कामासाठी येथील जमिनीचे नमुने घेण्यासाठी पाठविलेल्या अधिकाऱ्यांना पिटाळून लावले.

पहिलीच संरक्षित खासगी कंपनी

राष्ट्रीय प्रकल्प म्हणून विमानतळ प्रकल्पाला प्रथम प्राधान्य दिलेल्या सिडको व राज्य शासनाने अखत्यारीतील ११६० हेक्टर जमिनीवर स्थापत्य कामे करण्यास सुरुवात केली आहे. या जमिनीवर काम करणाऱ्या ठेकेदारांचे करोडो रुपयांचे साहित्य व यंत्रसामग्री सध्या येत आहे. त्याच वेळी सिडकोचे अधिकारीही कामावर देखरेख ठेवण्यासाठी जात असल्याने त्यांच्या जीविताला धोका असल्याने सिडकोने चाळीस सशस्त्र जवानांचे एक पथक सिडको व खासगी कंपनीच्या कामगारांच्या संरक्षणासाठी तैनात ठेवले आहे. एखाद्या बडय़ा प्रकल्पासाठी अशा प्रकारे संरक्षण दल ठेवण्याची सिडको इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. या संदर्भात सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2016 2:18 am

Web Title: navi mumbai airport seafty
Next Stories
1 ऐरोलीतील सिडको वसाहतीला वाढीव वीजबिलाचा झटका
2 दि.बा. महाविद्यालयासाठी सिडकोला साकडे
3 दात काढताना महिलेचा मृत्यू
Just Now!
X