24 January 2021

News Flash

विमानतळाच्या कामाला सोमवारपासून सुरुवात

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प २० वर्षे केवळ चर्चेत

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प २० वर्षे केवळ चर्चेत

लोकसत्ता, विकास महाडिक

नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर आणि बांधकाम कंपनीला न मिळालेला वित्तपुरवठा यामुळे गेले सहा महिने रखडलेला देशाचा महत्त्वाकांक्षी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प करोना प्रादुर्भावामुळे पूर्णपणे ठप्प झाला होता. टाळेबंदीच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार काही महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे सुरू होणार असून यात सिडकोने सोमवारपासून विमानतळाच्या कामाला सुरुवात करण्याची तयारी सुरू केली आहे.

नवी मुंबई विमानतळ उभारणीतील ९८ टक्के प्रश्न आता सुटलेले असून प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर पार पडण्याच्या अंतिम टप्प्यात असल्याचा सिडको प्रशासनाचा दावा आहे. याच काळात हा विमातनळ बांधणाऱ्या जीव्हीके अर्थात नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. या कंपनीला वित्तपुरवठा करण्यास एका राष्ट्रीयीकृत बँकेने तयारी दर्शविली आहे. त्यामुळे कंपनीसमोरील निधीची समस्या दूर झाल्याने या बांधकाम कंपनीने विमानतळाची धावपट्टी तसेच टर्मिनल्स ही महत्त्वाची कामे बांधकाम श्रेत्रात अग्रणी असलेल्या एल अ‍ॅन्ड टी कंपनीला दिलेली आहेत. वित्तीय व्यवहार पूर्ण झाल्यानंतर ही कंपनी लागलीच ही कामे सुरू करणार होती. त्याचवेळी मार्चच्या सुरुवातीस करोनाचे संकट देशात येऊन धडकले आहे. त्यामुळे अगोदरच काही समस्यांमुळे रखडलेल्या विमानतळाच्या प्रमुख कामाला पुन्हा अडथळा निर्माण झाला आहे.

या प्रकल्पांवर काम करणारे कामगार तसेच अधिकाऱ्यांना टाळेबंदीच्या या काळात घरी राहावे लागले असून सिडकोने प्रमुख प्रकल्पांवर काम करणाऱ्या सुमारे अडीच हजार मजूर कामगारांची निवास व भोजनाची व्यवस्था केलेली आहे.

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी व्यक्तिश: लक्ष घालून या कामगारांची काळजी घेण्याचे आदेश कंत्राटदारांना दिले आहेत. मजूर कामगार याच ठिकाणी असल्याने केंद्र सरकारने दुसऱ्या टप्प्यात परवानगी दिलेल्या बांधकाम क्षेत्रात विमानतळाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. मजूर, कामगार आणि अधिकारी कर्मचाऱ्यांची सर्व काळजी घेत सामाजिक अंतर राखून ह्य़ा ठप्प झालेल्या कामाला सोमवारपासून सुरुवात केली जाणार आहे.

टाळेबंदीनंतर विमानतळाचे काम पूर्णत: बंद करण्यात आले होते. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अखेरच्या टप्प्यात आहेत. धावपट्टीसाठी लागणारे सपाटीकरण झालेले आहे. उलवा नदीचा प्रवाह यापूर्वीच बदलण्यात आलेला आहे. त्यामुळे आता मुख्य कामाला लवकर सुरुवात होणार होती. त्याचवेळी टाळेबंदी जाहीर झाली. सरकारने आता काही बांधकाम क्षेत्राला परवानगी दिली आहे. त्यामुळे सोमवारपासून विमानतळाच्या कामाला सुरुवात करीत आहोत.

-राजेंद्र धयाटकर, मुख्य अभियंता, नवी मुंबई विमानतळ, सिडको

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2020 1:36 am

Web Title: navi mumbai airport work will begins from monday zws 70
Next Stories
1 पायी स्थलांतर करणाऱ्या १०३ कामगारांना निवारा
2 नवी मुंबई महापालिकेत आरोग्य विभागात अस्वस्थता
3 Coronavirus : नवी मुंबईत १८ रुग्ण करोनामुक्त   
Just Now!
X