आरोग्य यंत्रणा सतर्क;  केंद्रातील समस्या, अडचणी, उपचारपद्धतीबाबत थेट रुणांकडून माहिती

विकास महाडिक, लोकसत्ता

नवी मुंबई : वाढत्या करोनाबाधित रुग्णांच्या संख्येला पुरेशी आरोग्य यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपाययोजना करणारे नवी मुंबई पालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘टॉक विथ द पेशंट’ असा उपक्रम सुरू केला आहे. विविध करोना काळजी केंद्रांमधील उपचार घेणाऱ्या करोनाबाधितांशी मोबाइलद्वारे संवाद साधून त्यांच्याकडूनच तेथील समस्या, अडचणी, उपचारपद्धतीबाबत त्यांची मते जाणून घेतली जात आहेत. राज्यात अशा प्रकारे आयुक्तांनी रुग्णांशी थेट संवाद साधून त्यांना दिलासा देण्याचा हा पहिलाच उपक्रम आहे.

नवी मुंबईतील करोनाबाधित रुग्णांचा आकडा तीस हजारांच्या पार गेला आहे तर मृतांची संख्या ६७१ आहे. घरात विलगीकरण झालेल्या नागरिकांची संख्या ५२ हजारांच्या घरात आहे. शहरातील दहा करोना काळजी केंद्रांमध्ये एक हजारपेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत असून वाशी येथील विशेष कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १४२ आहे. खासगी रुग्णालयात नवी मुंबईतील रुग्णांपेक्षा जास्त मुंबई, ठाणे, पनवेल, उरण या शहरांतील रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांसाठी जास्त रुग्णशय्या उपलब्ध करण्याची जबाबदारी पालिकेवर येऊन ठेपली आहे. कोविड कक्ष तसेच अत्यवस्थ रुग्णांसाठी जास्त खाटा तयार करण्याचे काम सुरू आहे. या सर्व रुग्णांची दिवसभरातून दोनदा माहिती घेण्यासाठी कॉल सेंटर तयार करण्यात आले असून रुग्णांशी दोन वेळा संपर्क साधला जात आहे. दिवसभरात पाच हजार रुग्णांशी संपर्क साधण्याचे काम केले जात आहे. पालिका आयुक्तांनी यात आता स्वत: यातील काही रुग्णांशी संवाद सुरू केला आहे. दिवसभरातील कोविडकाळाच्या व्यस्त दिनक्रमातून वेळात वेळ काढून आयुक्त पाच रुग्णांशी संर्पक साधत आहेत. बोलण्याच्या स्थितीत असलेल्या या रुग्णांना थेट आयुक्तांचा फोन जात असून कोविड केअर सेंटरमधील उपचार, डॉक्टरांच्या भेटी, सुधारणा, जेवण, इतर कर्मचारीवर्गाची वागणूक यांची थोडक्यात माहिती आयुक्त घेत आहेत. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना तर दिलासा मिळत आहे, पण याशिवाय स्थानिक आरोग्य यंत्रणा खडबडून जागी होत असून सतर्क राहात आहे. दहा कोविड केअर सेंटरमधील रुग्णांशी आळीपाळीने हा संवाद साधला जात आहे. त्यामुळे रुग्णांकडून थेट माहिती मिळत असून त्यात सुधारणा करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या जात आहेत.

वाशीतील ईएसआय रुग्णालय ताब्यात घेणार

वाशी येथे ईएसआय रुग्णालय आहे. यापूर्वी या ठिकाणी कोविड रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव होता, मात्र पालिकेने वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयाला पसंती दिल्याने हा प्रस्ताव बारगळला. शहरात कोविड रुग्णांची संख्या वाढत असून खासगी रुग्णालयात शहराबाहेर रुग्णांची जास्त आहे. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना खाटा न मिळण्याचे प्रकार घडत आहेत. सध्या अत्यवस्थ रुग्णांसाठी ३३५ खाटा असून त्या ठिकाणी रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याशिवाय १७४ खाटा तयार करण्याचे काम सुरू आहे. वाशी येथील ईएसआय रुग्णालयाची इमारत खूप जुनी आहे, मात्र त्या ठिकाणी वैद्यकीय रचना करण्यास जास्त वेळ लागणार नाही. त्यामुळे पालिका आयुक्त बांगर यांनी या रुग्णालयाला विशेष कोविड रुग्णालय म्हणून उभारण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. अत्यवस्थ रुग्णांना खाटा कमी पडता कमा नयेत हा त्यामागील उद्देश आहे. या ठिकाणी केवळ अत्यवस्थ रुग्णांसाठी १२५ खाटा लवकरच तयार केल्या जाणार आहेत.