पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची ग्वाही

नवी मुंबई पोलीस आयुक्तपदी कडक शिस्तीचे पोलीस अधिकारी म्हणून ओळख असणारे हेमंत नगराळे यांची नियुक्ती झाली आहे. बुधवारी त्यांनी पदाचा पदभार स्वीकारला. पोलीस आयुक्तांनी पाच वर्षांपासूनच्या गुन्ह्य़ांची नोंद नगराळे यांनी तपासली. त्यात ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुन्ह्य़ांची उकल झाली आहे. गुन्हेगारीतही मोठी वाढ झाली नसल्याचे आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी उकल न झालेल्या गुन्ह्य़ांच्या फायली बाहेर काढण्यात येणार असून त्यासाठी विशेष पथक नियुक्त करणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

या वेळी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील परिसर हा अत्यंत शिस्तबद्ध असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. या वेळी नवी मुंबईत होणाऱ्या गुन्हय़ांपैकी ६० टक्के गुन्हय़ांची उकल होत असल्याचे समोर आले आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात कोणत्याच पोलीस आयुक्तलय क्षेत्रात गुन्हे उकल होत नसल्याचे ते म्हणाले. पोलीस आयुक्तालय क्षेत्रात सोनसाखळी हिसकावण्याच्या आणि वाहनचोरीच्या घटना या गंभीर आहेत. या चोऱ्यांमागील टोळीचा शोध घेण्यात येईल. यासाठी पोलीस उपायुक्तांशी बैठक घेऊन चर्चा करणार आहे. पोलिसांना प्रशिक्षण देणे आवश्यक असून त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नवी मुंबईत पोलीसांची संख्या लोकसंख्येच्या तुलनेत कमी आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. ज्यांना पोलीस संरक्षणाची आवश्यकता नाही, अशांची सुरक्षा काढून घेण्यात येईल, असे संकेतही त्यांनी दिले. परिमंडळ १ आणि २ मध्ये जाऊन स्थानिक नागरिकांशी चर्चा कारणार असून त्यांच्या समस्या समजून घेणार आहे, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.