गुन्ह्यंची संख्या कमी दाखवण्याच्या प्रयत्नांबाबत पोलीस आयुक्तांची स्पष्टोक्ती

शेखर हंप्रस, नवी मुंबई</strong>

आपल्या कार्यकाळात आपल्या क्षेत्रात गुन्हेगारीचे प्रमाण कमी राहावे म्हणून पोलीस आयुक्त अर्थात त्या शहरातील पोलिसांचे नेतृत्व तत्पर असते. मात्र केवळ गुन्हे कमी करण्यासाठी गुन्ह्य़ांची शक्य तेवढी नोंद कमी करण्याच्या फॉम्र्युल्यावर विद्यमान पोलीस आयुक्त संजीव कुमार यांनी बुधवारी झालेल्या वार्षिक पत्रकार परिषदेत अप्रत्यक्ष टीका केली.

गुन्हेगारीच्या प्रकारात आता बदल होऊ  लागले असून पारंपरिक गुन्ह्य़ांत निश्चित घट होत आहे. मात्र, आता गुन्हेगारीचे तंत्र बदलत असून आर्थिक आणि सायबर गुन्हे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे. त्यातच नवी मुंबईसारख्या सायबर सिटीत गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार गुन्हेगारीत १० टक्के होणारी अपेक्षित असते. मात्र त्यापेक्षा जास्त वाढ समाजहितासाठी घातक मानली जाते. असे असताना नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रात लोकसंख्या  झपाटय़ाने वाढत असताना गेल्या काही वर्षांत गुन्हेगारीत घट दाखवली जात आहे, ही धक्कादायक बाब मानली जात आहे. ही घट २०१६ आणि २०१७ मध्ये झाली होती. या कार्यकाळात पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे होते. गुन्हे घटल्याने आश्चर्य व्यक्त होत होते, तर पोलीस विभागात मात्र ‘साहेबांची जादू’ असे बोलले जात होते. याच कार्यकाळात गुन्हेच दाखल केले जात नसल्याची ओरडसुद्धा होत होती.

तसेच तत्कालीन पोलीस आयुक्त के.एल प्रसाद यांच्या कार्यकाळात मोठय़ा प्रमाणात गुन्हे वाढल्याची टीका होत होती. मात्र जो पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यास येईल त्याचा गुन्हा नोंद झालाच पाहिजे यावर प्रसाद यांचा कटाक्ष होता. या काळात गुन्ह्यंची संख्या वाढली असली तरी गुन्हे प्रकटीकरणात वाढ झाली होती. याचीच पुनरावृत्ती सध्या दिसून येत आहे.

प्रसाद यांच्याप्रमाणेच या आयुक्तांनीही गुन्हा नोंदीची आकडेवारी कितीही वाढू द्या, आपण गुन्हे उकल करू, पण गुन्हा नोंद केला नाही ही तक्रार चालणार नाही, अशा कडक सूचना दिल्या आहेत.

त्यांना जोड उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे, गुन्हे शाखा उपायुक्त तुषार दोषी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुन्हेगाराविरोधात कंबर कसली आहे. परिणामी  किचकट गुन्ह्यंची उकल यशस्वीपणे होत आहे.

गुन्हे नोंद आकडेवारीत घट हे पोलिसांचे यश गृहीत धरले तर गुन्हाच नोंद केला नाही तर गुन्हेगारी संपली असे होणार नाही. लोकसंख्येच्या तुलनेत १०टक्के गुन्हेवाढ गृहीत धरली जाते. यात नैराश्य, बेरोजगारी, गरिबी ही गुन्हेगारीकडे वळण्याची मुख्य कारणे आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी योग ती उपाययोजना करताना गुन्हेगारावर वचक याचबरोबर पोलिसांची प्रतिमा सुधारून लोकसहभाग वाढवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.

-संजीव कुमार, पोलीस आयुक्त