साडेपाच हजार जणांना संसर्ग, ३३ पैकी १७ प्रतिबंधित क्षेत्रे

नवी मुंबई : ठाणे जिल्ह्यात कल्याण-डोंबिवलीनंतर नवी मुंबईतील करोनाबाधितांची संख्या सर्वाधिक असून शहरातील नेरुळ, वाशी व ऐरोली या तीन विभागांत संसर्ग वाढत आहे. त्यात नेरुळ विभाग हा सर्वाधिक बाधित असून आतापर्यंत ५ हजार ४५८ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर ऐराली विभागात करोनामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.

शहरात करोनाबाधितांची संख्या २९ हजारांच्या पुढे गेली असून हा आकडा ठाणे जिल्ह्यात कल्याण-डोंबिवलीनंतर सर्वाधिक बाधित हे नवी मुंबईत आहेत. येथील बेलापूर, नेरुळ, तुर्भे,वाशी, कौपरखैरणे, ऐरोली, घणसोली, दिघा या आठ विभागांत नेरुळमध्ये आतापर्यंत सर्वाधिक बाधित रुग्ण आहेत. येथील झोपडपट्टी भागात मात्र एकही करोनाबाधित नाही. नेरुळ हे नवी मुंबईतील मोठे उपनगर असून ३२ सेक्टरमध्ये विभागणी झाली आहे. लोकसंख्याही सव्वादोन लाखांपर्यंत आहे.

करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर सुरुवातीच्या काळात बेलापूर, नेरुळ विभागातच रुग्ण सापडत होते. त्यानंतर एपीएमसी बाजार आवारात रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडू लागले. एपीएसीतील व्यापारी, माथाडी हे कोपरखैरणे विभागात राहात असल्याने हा संसर्ग तेथे वाढत गेला. नेरुळ विभागातही सिडकोची एलआयजी कॉलनी तसेच कृषी उत्पन्न बाजारपेठेत काम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच या विभागातील बहुतांश नागरिक मुंबईत बेस्ट, पोलीस, सरकारी रुग्णालये अशा शासकीय आस्थापनांमध्ये काम करीत आहेत. त्यामुळे येथील बाधितांचे प्रमाण वाढत असल्याचे निष्कर्ष काढला जात आहे. तसेच या विभागात नेरुळ, शिरवणे, कुकशेत व सारसोळे ही मोठी लोकसंख्या असलेली गावेही आहेत.

१ सप्टेंबरपासून टाळेबंदीतून मिळालेल्या सवलतीमुळे आता नागरिकांचा संचार वाढला असल्याने संसर्ग वाढत आहे. नेरुळ रेल्वेस्थानक परिसर तसेच विविध भागांत असलेल्या मार्केटमध्ये होत असलेल्या गर्दीमुळेही संसर्ग वाढत आहे. नवी मुंबई पालिकाक्षेत्रात सध्या ३३ प्रतिबंधित क्षेत्र अर्थात अतिसंक्रमित भाग आहेत. यातील अतिसंक्रमित भाग हे नेरुळ विभागातील आहेत.

नेरुळ विभागात मोठ्या प्रमाणात घरोघरी तापसणी करण्यात आली आहे. मात्र यात नागरिक लक्षणे जाणवत असतानाही ती सांगत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेही रुग्ण वाढत आहेत.।नागरिकांनी आजार लपवण्यापेक्षा करोनाबाबतची तात्काळ माहिती देण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

नेरुळ, वाशी व ऐरोली येथील रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे या ३ विभागांवर जास्त लक्ष केंद्रित करण्यात येत असून प्रतिबंधित क्षेत्रामध्ये विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. नेरुळमधील झोपडपट्टी विभागात रुग्णसंख्या नाहीच परंतु इतर ठिकाणी नागरिकांनी काळजी घेणेआवश्यक आहे.

-अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका