अर्धवट बांधून झाल्यानंतर काम ठप्प

नवी मुंबई पालिकेने नेरुळ येथील स्केटिंग पार्कचे काम अर्धवट सोडल्यामुळे त्यावर करण्यात आलेला कोटय़वधी रुपयांचा खर्च वाया जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रशासकीय मंजुरीच्या तांत्रिक चौकटीत अडकल्याने आणि संबंधित अभियंत्याला निलंबित करण्यात आल्यामुळे कामात खंड पडल्यापासून स्केटिंग पार्कचे काम ठप्पच झाले आहे.

नवी मुंबईतील विविध प्रकल्पांना राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आले आहे. या शहराने क्रीडा परंपरा जोपासली आहे. ‘फिफा’च्या १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषकाचे यजमानपद नवी मुंबईने भूषविले आहे. बेलापूर येथील राजीव गांधी स्टेडियममध्येही विविध खेळांना प्रोत्साहन दिले जात आहे. इथे रणजी सामने खेळवण्याचे पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. घणसोलीत देखणे सेंट्रल पार्क होत आहे. कुस्तीचा आखाडा विकसित करण्याच्या दृष्टीने पालिकेने पावले उचलली आहेत. सागर नाईक यांच्या महापौरपदाच्या कारकीर्दीत पालिकेच्या पहिल्या स्केटिंग पार्कनिर्मितीचे काम सुरू करण्यात आले. यशवंतराव चव्हाण क्रीडांगणालगतच्या एक हजार ४५० चौ.मीटरच्या भूखंडावर खोलगट आणि लंबवर्तुळाकार स्केट पार्क साकारण्यास सुरुवात झाली, परंतु अल्पावधीतच काम बंद पडले. स्केटिंग पार्कशेजारी १४० प्रेक्षकक्षमता असलेले बहुपयोगी सभागृह, व्यासपीठ आणि बॅडमिंटन कोर्ट तयार करण्यात येणार होते. मात्र, हे प्रकल्प अद्याप साकार झालेलेच नाहीत.

तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाच्या काळात या अर्धवट सोडलेल्या प्रकल्पांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याच मुद्दय़ावरून त्यांनी एका कार्यकारी अभियंत्याला निलंबित केले होते. या स्केटिंग पार्कसाठी परदेशातून वास्तुविशारद बोलावण्यात आले होते, परंतु प्रशासकीय मंजुरीच्या तांत्रिक चौकटीत अडकल्याने संबंधित अभियंत्याला निलंबित केल्यापासून काम बंद पडले. या कामासाठी कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आले असून पार्क तयार न झाल्यामुळे करदात्यांचे पैसे वाया गेले आहेत. या संदर्भात तत्कालीन महापौर सागर नाईक यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ  शकला नाही. घणसोलीतील सेंट्रल पार्कमध्ये स्केटिंगची सुविधा करण्यात आली आहे.

नेरुळ येथे स्केटिंग पार्क तयार करण्यात येणार होते. परंतु तांत्रिक अडचणींमुळे काम अर्धवट आहे. या प्रकरणात एका अभियंत्याला निलंबितही केले होते. या प्रकल्पासाठी खर्च झालेला नागरिकांचा कररूपी पैसा वाया जाऊ नये यासाठी पालिका योग्य निर्णय घेईल.

रामास्वामी एन., आयुक्त, नवी मुंबई महापालिका