रेल्वे स्थानकातील फलाट आणि लोकलमधील वाढलेले अंतर आणखी किती काळ प्रवाशांना त्रास देणार आहे. याविषयी मध्यंतरी वर्तमानपत्रात विविध बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यावर आमदार, खासदारांनी रेल्वे स्थानकांची पाहणी करीत हे काम तात्काळ करण्याचे आदेश दिले. रेल्वे प्रशासनानेही हे अंतर कमी करण्याविषयी काम सुरू केले, परंतु आजही अनेक ठिकाणी रेल्वे स्थानक आणि लोकलमधील अंतर जास्त आहे. यामुळे प्रवाशांना रेल्वेत चढताना किंवा उतरताना अनेक कष्ट घ्यावे लागत आहेत.
डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक तीनवर महिलांच्या मधल्या डब्याजवळील फलाट आणि लोकलमध्ये किमान गुडघाभर अंतर आहे. तसेच फलाट क्रमांक पाचवर तर सगळीकडेच ही समस्या भेडसावते. फलाट क्रमांक एक व दोनची उंची वाढविण्याचे काम केले, परंतु ते केवळ कल्याण दिशेच्या पहिल्या महिला डब्याजवळ काम करण्यात आले आहे. त्यानंतर काही हे काम पुढे गेले नाही. रेल्वे प्रशासनाकडे निधी नाही की काम करण्याची इच्छा नाही हे कळत नाही. परंतु लोकप्रतिनिधीही केवळ वर्तमानपत्रात बातम्या आल्यानंतर जागे होतात आणि प्रशासन केवळ दिखाऊगिरीची मोहीम आखते, असे वाटते. एक तरी समस्या पूर्णत: मार्गी लागली आहे का याचा विचार त्यांनी स्वत: करावा. रेल्वे प्रवासी संघटना कुणाचा तरी जीव गेल्यानंतर निषेधाच्या घोषणा देते, परंतु दररोज प्रवाशांना करावा लागणारा हा जीवघेणा प्रवास त्यांना दिसत नाही का? रेल्वे डब्यातून हल्ली प्रवाशांनी कृपया फलाटातील अंतर ते पायदान याकडे लक्ष द्यावे, अशी उद्घोषणा केली जाते. परंतु यातील अंतर कमी करण्यासाठी काही उपाययोजना कोणी करताना दिसत नाही.
पाणीकपातीआधी गळती रोखा!
रोहित नार्वेकर, कल्याण : दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर पाणीकपात अटळ असली, तरी पाणीपुरवठा विभागाने आधी शहरातील वाहिन्यांमधून होणारी गळती रोखून पाणी बचत करावी. याबाबत पालिकेनेच पुढाकार घ्यावा, असे मला वाटते.
पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे. यासाठी नागरिकांसह सर्वाच्या सहकार्याची अपेक्षा आहे. कल्याण शहरात अनेक ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. पालिकेने गळती काढण्याचे काम गांभीर्याने केल्यास वाया जाणाऱ्या पाण्याची बचत होईल. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने जलवाहिन्यांची गळती काढण्याच्या कामास प्राधान्य द्यावे. कल्याण शहराच्या अखत्यारीत असलेल्या भागातही गळतीचे प्रमाण मोठे आहे. मात्र प्राधिकरणाला सांगून काहीही उपयोग होणार नाही. त्यांचे काम म्हणजे पालथ्या घडय़ावर पाणी असेच आहे. इतक्या वर्षांत एकाही जलवाहिनीची गळती त्यांना काढता आली नाही की पाणीपुरवठा सुरळीत करता आला नाही. त्यामुळे आता सांगूनही त्यांच्याकडून काहीही होणार नाही. त्यामुळे प्राधिकरणाच्या जलवाहिन्यांची गळती काढण्याचे कामही पालिकेने करावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
पार्किंगचा पत्ता नाही, मैदान मात्र गमावले..!
रमेश दळवी, अंबरनाथ : अंबरनाथ शहराच्या पूर्व विभागात अगदी रेल्वे स्थानकालगत असलेल्या शिवाजी चौकात कै. यशवंतराव चव्हाण खुले नाटय़गृह व त्यासमोर भव्य पटांगण ही शहराची शान होती. खुल्या नाटय़गृहालगतचे हे मैदान शहरातील राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचा केंद्रबिंदू होते. अंबरनाथ शहराची ती एक प्रमुख ओळख होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंपासून अनेकांच्या सभा या मैदानात झाल्या. नामांकित कलावंतांचा सहभाग असणारी व्यावसायिक नाटके झाली. व्याख्यानमाला असोत वा क्रीडा स्पर्धा चव्हाण नाटय़गृहासमोरील खुल्या मैदानात त्या रंगत. कारण ही जागा शहराच्या अगदी मध्यभागी आहे. मात्र गेल्या दोन दशकांत काहीच भरीव करून न दाखविणाऱ्या पालिकेतील सत्ताधाऱ्यांची दोन-अडीच वर्षांपूर्वी या मैदानाला दृष्ट लागली. या मैदानाच्या जागी तळघरात वाहनतळ व त्यावर खुले नाटय़गृह उभारण्याची नामी योजना पालिका प्रशासनाच्या वतीने आखण्यात आली. त्याचा आकर्षक आराखडा आणि प्रतिकृतीही तयार केली. अमेरिकेतील ‘व्हाइट हाऊस’सारखी दिसणारी वास्तू इथे उभारण्याचे आश्वासन देण्यात आले. या उपक्रमात ‘गाळे’ घुसडून त्याची उपयुक्तता अधिक ‘अर्थ’पूर्णही करण्यात आली. आता तर गाळेही रद्द करून फक्त वाहनतळ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या दुराग्रहामुळे शहराने मोक्याच्या जागी असलेले एक मैदान मात्र गमावले, असे खेदाने नमूद करावेसे वाटते. सध्या या प्रकल्पाचे काम रडतखडत सुरू आहे. नेमके येथे काय होणार, याचा कोणालाही पत्ता नाही. स्वत:ला लोकप्रतिनिधी म्हणवून घेणारे राजकीय नेते जनतेला अजिबात विश्वासात न घेता एका चांगल्या गोष्टीचे कसे मातेरे करतात, याचे हे उत्तम (खरे तर वाईट) उदाहरण आहे.