17 December 2018

News Flash

शहरातील १०० कचराकुंडय़ा हद्दपार

गेल्या वर्षभरात शहरातील ७०० कचराकुंडय़ांपैकी १०० कचराकुंडय़ा हटवण्यात आल्या आहेत.

प्रतिनिधिक छायाचित्र

ठिकठिकाणी ठेवण्यात आलेल्या सार्वजनिक कचराकुंडय़ांमुळे शहराच्या स्वच्छ प्रतिमेस गालबोट लागू नये, म्हणून नवी मुंबईला कचराकुंडीमुक्त करण्याचे धोरण पालिकेने स्वीकारले आहे. गेल्या वर्षभरात शहरातील ७०० कचराकुंडय़ांपैकी १०० कचराकुंडय़ा हटवण्यात आल्या आहेत. उर्वरित कचराकुंडय़ाही टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येणार आहेत, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६’ नुसार जिथे कचरा निर्माण होतो, तिथेच त्याचे वर्गीकरण करणे पालिकेने बंधनकारक केले आहे. ओला कचरा हिरव्या कचराकुंडीत व सुका कचरा निळ्या कचराकुंडीत टाकणे, कचऱ्यावर सेंद्रिय अथवा जैविक पद्धतीने प्रक्रिया करून संकुलाच्या आवारात अथवा घरांमध्येच खतनिर्मिती करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. शहरातील अनेक सोसायटय़ांनी वर्गीकरण करण्यास सुरुवात केली आहे, तर काही सोसायटय़ांमध्ये ओल्या कचऱ्याचे सोसायटीच्या आवारातच विघटन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे काही भागांतील कचराकुंडय़ा रिकाम्या राहू लागल्या होत्या. अशा १०० कचराकुंडय़ा पालिकेने कमी केल्या आहेत.

शहरामधील सर्व दुकानदार व व्यावसायिकांनीही आपले दुकान व कार्यालयात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करूनच तो महानगरपालिकेच्या घंटागाडीत टाकावा, अशी सूचना करण्यात आली आहे. पालिका क्षेत्रातील सर्व रहिवाशांनी आपले शहर स्वच्छ व कचरामुक्त ठेवण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अस्वच्छतेच्या तक्रारींसाठी अ‍ॅप

नवी मुंबई : ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत जानेवारी २०१८ पासून देशभरात स्वच्छ सर्वेक्षण २०१८ सुरू होणार आहे. त्यात सुमारे ४ हजार ४१ शहरे सहभागी होणार आहेत. शहरांची दर्जात्मक व गुणात्मक सुधारणा करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता ‘एमओएचयूए अ‍ॅप’  कार्यान्वित करण्यात आले आहे. याद्वारे नागरिकांना दैनंदिन स्वच्छताविषयक तक्रारी नोंदविता येणार आहेत. या अ‍ॅपद्वारे नागरिक स्वच्छतेविषयक नऊ प्रकारच्या तक्रारी सहज करू शकतात. त्यांचे १२ तासांच्या आत निराकरण करून नागरिकांना त्याची माहिती कळविण्यात येते.

या अ‍ॅपद्वारे नागरिकांना कचऱ्याचा ढीग साचलेला असणे, कचऱ्याची गाडी वेळेवर न येणे,  सार्वजनिक कचराकुंडी रिकामी न करणे, रस्ते सफाई न करणे, मृत प्राणी रस्त्यात पडलेला असणे, सार्वजनिक शौचालयांमधील साफसफाई, सार्वजनिक शौचालयांमध्ये सांडपाणी तुंबणे, सार्वजनिक शौचालयांमध्ये पाणीपुरवठा नसणे, वीजपुरवठा नसणे अशा प्रकारच्या तक्रारी तसेच दैनंदिन स्वच्छताविषयक तक्रारी करता येणार आहेत. त्यात अस्वच्छ ठिकाणाची माहिती छायाचित्रासहित नोंदविण्याची सुविधा आहे.

स्वच्छता अ‍ॅपवर आलेल्या तक्रारींचे १२ तासांत निराकरण करून त्याची छायाचित्रे पालिका किंवा संबंधित प्राधिकरणाला अ‍ॅपवर अपलोड करावी लागतील. तक्रारींचे निवारण झाल्यानंतर संबंधित नागरिकांना अभिप्रायही नोंदवता येईल. नवी मुंबई शहरातील स्वच्छतेत दर्जात्मक व गुणात्मक सुधारणा करण्यासाठी नागरिकांनी या अ‍ॅपचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन महापौर जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त डॉ. रामस्वामी एन. यांनी केले आहे.

First Published on November 15, 2017 2:56 am

Web Title: nmmc adopted policy to make navi mumbai dustbin free