नियमावलीचे पालन करण्याचे पालिका प्रशासनाचे आवाहन
नवी मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून नवी मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंत २८ लाख १६ हजार ७०० रुपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल केलेली आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीकडून एक हजार, मास्क न लावणाऱ्या व्यक्तीकडून ५०० रुपये सुरक्षित अंतर न पाळणाऱ्या व्यक्तीकडून २००, तर व्यापारी, दुकानदार यांच्याकडून दोन हजार रुपये दंड म्हणून महापालिकेकडून आकारले जात आहेत. मिशन बिगीन अगेनअंतर्गत दैनंदिन व्यवहारात शिथिलता दिल्यानंतर नागरिकांकडून तितक्याशा गंभीरपणे नियम पाळले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. करोनाच्या काळात पालिकेने दिलेले नियम न पाळणे हे वैयक्तिक आणि सामाजिक आरोग्याला घातक आहे. म्हणूनच नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
दंडवसुली
* थुंकणे – २६ हजार,
* मास्क न लावणे – ११ लाख ११ हजार ८००
* सुरक्षित अंतर न पाळणे १ लाख ५६ हजार १००
* सुरक्षित अंतर न पाळणारे व्यापारी/ दुकानदार – १५ लाख २२ हजार ८००
* एकूण दंडवसुली २८ लाख १६ हजार ७०० रुपये
नागरिकांनी करोना नियमावलींचे पालन केले पाहिजे. दंड वसूल करावी लागू नये असे वागावे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’प्रमाणे प्रत्येकाने ‘माझे शहर माझी जबाबदारी’ या भावनेतून नियम पाळावेत.
– अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका