सानपाडा सेक्टर-२मध्ये नवी मुंबई महापालिकेचा पहिला आखाडा लवकरच पूर्णत्वास

नवी मुंबईतील कुस्तीपटूंनी तब्बल २५ वर्षे प्रतीक्षा केल्यानंतर आता हक्काचा आखाडा त्यांच्या दृष्टिपथात आला आहे. सानपाडा सेक्टर २ येथील भूखंड क्रमांक १०वर पालिकेच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या पहिल्या आखाडय़ाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आता केवळ अंतर्गत काम शिल्लक आहे. नवी मुंबईत क्रिकेट, फुटबॉलसाठी कोटय़वधी रुपये खर्च करण्यात येत असताना येथील कुस्तीपटू मात्र आजवर वाशी येथे पत्र्याच्या शेडमध्ये सराव करत होते.

पालिकेचा शहरात एकही कुस्ती आखाडा नव्हता. त्यामुळे कुस्तीपटूंनी वाशीत ट्रक टर्मिनलच्या शेजारी पत्र्याची शेड उभारून तात्पुरता आखाडा तयार केला होता. गेली नऊ वर्षे तिथेच तरुण कुस्तीपटूंना धडे दिले जात होते. पावसाळ्यात गळक्या छपरातून येणाऱ्या पाण्यामुळे लाल माती वाहून तर जाणार नाही ना असा प्रश्न खेळाडू आणि प्रशिक्षकांनी पडत असे. याबाबत ‘लोकसत्ता’ने ‘कुस्ती पावसात भिजतेय!’ असे वृत्त देऊन पाठपुरावा केला होता. आता या आखाडय़ाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजारपेठेत हजारो माथाडी कामगार आहेत. ते सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे परिसरातील आहेत. या भागांत कुस्ती फार पूर्वीपासून खेळली जात असून हा अतिशय लोकप्रिय खेळ आहे. या कामगारांच्या पुढच्या पिढय़ांनीही या रांगडय़ा खेळाची आवड जोपासली आहे. तात्पुरत्या आखाडय़ात १०० मुले कुस्तीचे धडे घेत आहेत. त्यामुळे पालिकेचा आखाडा तयार होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. शहरातील कुस्तीपटूंना प्रशिक्षणासाठी पुणे, कोल्हापूर, सांगलीला जावे लागत असे. आता त्यांना आपल्याच शहरात सराव करता येणार आहे.

नवी मुंबईतील कुस्तीपटूंना आखाडय़ाअभावी कोल्हापूर, पुणे येथे पाठवावे लागत असे. आता सानपाडय़ात हक्काच्या आखाडय़ाचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे, ही आनंदाची बाब आहे. तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाच्या काळात यासाठी प्रयत्न केले होते. लवकरच नवीन आखाडय़ात कुस्तीचा डाव रंगेल.

कृष्णा रासकर, राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते

नवी मुंबईतील कुस्तीपटूंना लवकरच हक्काचा आखाडा उपलब्ध होणार आहे. आखाडय़ासाठी ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. काम अंतिम टप्प्यात आहे. ते मुदतीत पूर्ण करण्यात येणार आहे.

– मोहन डगावकर, शहर अभियंता

* ठिकाण- सानपाडा सेक्टर २, भूखंड क्रमांक १०

* ठेकेदार- मे. जुरानी इंटरप्रायजेस

* कामाचा खर्च- २१ लाख ८५ हजार ४३३ रुपये

* काम पूर्णत्वाची मुदत- ३० नोव्हेंबर २०१७