महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश
यंदा पाऊस नियोजित वेळेपूर्वीच दाखल होण्याचा वेधशाळेचा अंदाज आहे. त्यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेसह पालिका क्षेत्रातील सर्व प्राधिकरणांनी पावसाळापूर्व कामांचे नियोजन करावे व दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण करावीत असे निर्देश महापालिका आयुक्त तथा शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. रामास्वामी एन. यांनी दिले आहेत.
पावसाळापूर्व कामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी शहर आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी आयुक्तांनी विविध कामांबाबत सूचना केल्या. यामध्ये रबर बोट, पंप तसेच उपलब्ध उपकरणे सुरू असल्याबाबत तपासणी करून घेणे, पावसाळापूर्व नाले व गटार सफाई, रस्त्यांवरील खोदकामे बंद करून रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे २५ मे पर्यंत करणे त्याचप्रमाणे मॅनहोलच्या ठिकाणी कव्हर असणे, पावसाळी कालावधीत पदपथ खचण्याची शक्यता असलेल्या जागांची पूर्वपाहणी करून त्या ठिकाणी योग्य ती उपाययोजना करणे व तसे फलक लावणे अशा सूचनांचा समावेश आहे.
गटारे व नालेसफाईमधून निघालेला गाळ लगेचच तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी हलविणेबाबत दक्षता घेण्याची तसेच सिडको, रेल्वे, एम.आय.डी.सी., सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील नाले, कल्व्हर्टची साफसफाई करण्याचे विविध प्राधिकरणांना आयुक्तांनी सूचित केले आहे.
अतिक्रमण विभागामार्फत सर्व विभाग अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील अभियंत्यांसह धोकादायक इमारतींची पाहणी करून त्याची यादी जाहीर करावी व कोणतीही दुर्घटना घडू नये याकरिता दक्षता घ्यावी, पावसाळ्यातील संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता सर्व रुग्णालये, नागरी आरोग्य केंद्रे या ठिकाणी पुरेसा औषध साठा उपलब्ध करून ठेवणे, त्याचप्रमाणे व्यापक जनजागृती करण्याचे आवाहनही आयुक्तांनी विभागीय अधिकाऱ्यांना केले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका व इतर प्राधिकरणाचे आपत्कालीन विभागाशी संबंधित उच्च अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
आपत्कालीन व्यवस्थापन केंद्राची स्थापना
पावसाळ्यात संभावित पाणी साचण्याची तसेच दरड कोसळण्याच्या संभाव्य घटना लक्षात घेता महापालिका मुख्यालय, अग्निशमन केंद्र, तसेच पालिकेच्या आठही विभागीय कार्यालयांत २० मेपासून आपत्कालीन व्यवस्थापन केंद्राची स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्रातर्फे जी संवेदनशील ठिकाणे आहेत त्यांची पूर्वपाहणी केली जाणार आहे व त्यावर उपाययोजनाही करणार आहेत. पावसाळ्यात एखाद्या ठिकाणी आपत्ती ओढवली तर त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी हे केंद्र तत्पर राहणार आहे. हे केंद्र मनुष्यबळ, साधनसामग्री यंत्रणेसह सज्ज करण्याच्या सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.