तोटय़ात दोन कोटींची वाढ; पन्नास टक्के प्रवासी वाहतुकीमुळे खर्चात वाढ

नवी मुंबई : अगोदरच तोटय़ात सुरू असलेली नवी मंबई परिवहन उपक्रमाची बससेवा आणखी अडचणीत आली आहे. टाळेबंदीपूर्वी महिन्याला सहा कोटींपर्यंत सहन करीत असलेल्या तोटय़ात आणखी दोन कोटींची भर पडली आहे. त्यामुळ उपक्रमाची चिंता वाढली आहे.

एनएमएमटीची बससेवा सध्या पूर्ण क्षमतेने सुरू आहे. दिवसाला ३८४ बस विविध मार्गावर प्रवासी वाहतूक करीत आहेत. मात्र करोना संसर्गाची शक्यता असल्याने सामाजिक अंतरासाठी ५० टक्केच प्रवासी वाहतूक करता येत आहे. त्यात इंधन व वेतन खर्च कायम आहे, मात्र उत्पन्न कमी मिळत आहे.

टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात एनएमएमटीची बससेवा ही अत्यावश्यक सेवेसाठी वापरली जात होती. रुग्णालय, पोलीस, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांना त्यांच्या निवासस्थानापासून कामाच्या ठिकाणी ही सेवा दिली जात होती. यात नवी मुंबई शहर तसेच ठाणे, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली, पनवेल, उरण, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, दहिसरमोरी, खारघर, उलवे इत्यादी ठिकाणी दिवसाला सरासरी १० हजार प्रवासी प्रवास करीत होते. त्यानंतर टाळेबंदी शिथिलीकरणानंतर सर्वसामान्य प्रवाशांनाही ही बससेवा काही अटी-शर्थीवर सुरू करण्यात आली. यात क्षमतेपेक्षा पन्नास टक्केच प्रवास वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

त्यामुळे करोनापूर्वी प्रतिदिन ४० लाख रुपये होणाऱ्या उत्पन्नात घट होत ते २२ लाखांवर आले. त्यात इंधन खर्च, कर्मचारी वेतन कायम राहिल्याने हा तोटा वाढत आहे. टाळेबंदीपूर्वीही ही बस सेवा तोटय़ातच सुरू होती. या वेळी महिन्याला उपक्रमाला ६ कोटी एवढा तोटा सहन करावा लागत होता. आता यात दोन कोटींची वाढ झाली. महिन्याला ८ कोटींचा तोटा परिवहन उपक्रमाला होत आहे. त्यामुळे उपक्रमाची चिंता वाढली आहे.

 

टाळेबंदीत ९९५ बस

करोनाकाळातही एनएमएमटीची बससेवा विविध कारणांस्तव वापरण्यात आली. यात १८ बसचे रुग्णवाहिकेत रूपांतर करण्यात आले. तसेच राज्यातील स्थलांतरित ८७३  मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी २५ बस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच शहरातील  ३९ हजार ७४६ परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठीही एनएमएमटीने सेवा दिली.  ५ मे पासून आजपर्यंत ९९५ बस या सेवेसाठी एनएमएमटीने उपलब्ध करून दिल्या आहेत.

 

टाळेबंदीपूर्वी व सध्याचे मासिक उत्पन्न

जमा (रुपये लाखांत)

                             टाळेबंदीपूर्वी         टाळेबंदीनंतर 

वाहतूक उत्पन्न         ९९९.३३             ३५५.९०

बा उत्पन्न                 ५१.७७              २७.३७

एकूण उत्पन्न           १०५१.१०             ३८३.२७

एकूण खर्च                 १६७६.३२             ११५३.८२

खर्च (रुपये लाखात)

                               टाळेबंदीपूर्वी            टाळेबंदीनंतर

वेतनावरील खर्च             ७७६.३७              ६२५.२३

इंधनावरील खर्च            ४००.४५             १७२.९५

एकूण इतर खर्च              ४९९.५०             ३५५.६४

सरासरी मासिक तोटा     ६२५.२२             ७७०.५५