लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका रुग्णालयाच्या शवागारातून मृतदेहाची अदलाबदल झाल्याप्रकरणी तीन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यासंदर्भात नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

दिवा येथे राहणारी एक महिला आणि उलवा येथे राहणारे उमर शेख यांचा मृत्यू वेगवेगळ्या कारणांनी झाला. शवविच्छेदनानंतर दोघा मृतांना करोना संसर्ग झाला नसल्याचे  अहवालानंतर स्पष्ट झाले. त्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांना मृतदेह ताब्यात घेण्यास बोलावण्यात आले. १५ मे रोजी दिघा येथील मृत महिलेच्या कुटुंबीयांना उलवा येथील मृत उमर शेख याचा मृतदेह देण्यात आला. शेख याच्या पार्थिवावपर १७ मे रोजी  अंत्यसंस्कार करण्यात आले.

उमर याचे नातेवाईक पश्चिम  बंगाल येथूल आल्यावर उमर याचा मृतदेह घेण्यास जेव्हा नातेवाईक गेला त्यावेळी मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे समोर आले होते.

याबाबत वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.  याशिवाय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी चौकशी समितीची नेमणूक केली होती. चौकशी समितीचा अहवाल प्राप्त होताच आयुक्तांनी हलगर्जी करण्यात आल्याचा ठपका ठेवत तिघांना कारणे दाखवा नोटीस बजावली. दिघा येथील महिलेचा  मृतदेह अद्याप शवागारात  आहे.