शहरी भागात वाढता संसर्ग; पालिकेच्या आरोग्य विभागाचे सर्वेक्षण

नवी मुंबई : वाढणारी करोना रुग्णसंख्या हा नवी मुंबईसाठी चिंतेचा विषय असून ही रुग्णसंख्या शहरी भागातील जास्त प्रमाणात असल्याचे एका सर्वेक्षणावरून दिसून आले आहे. नवी मुंबईतील ग्रामीण व झोपडपट्टी भागात आता रुग्ण मिळण्याचे प्रमाण पाच ते सहा टक्के शिल्लक आहे. धारावी व मालेगावप्रमाणे या भागात मोठय़ा प्रमाणात तपासण्या करून संशयित रुग्णांचा शोध घेण्यात आला होता. या क्षेत्रातील रोग प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) वाढल्याचेही या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

शहरी, ग्रामीण आणि झोपडपट्टी या संमिश्र लोकवस्तीने नवी मुंबईची निर्मिती झाली आहे. शहराच्या अंतर्गत भागात परांपरागत गावे आणि पूर्व बाजूस झोपडपट्टी अशी नवी मुंबईची रचना असून या दोन भागांच्या आजूबाजूला शहरी वसाहत वसलेली आहे. नवी मुंबईतील करोनाबाधित रुग्णांची संख्या २३ हजाराच्या वर गेली असून यातील जास्तीत रुग्ण हे गृहनिर्माण संस्थांमधील असल्याचे आढळून आले आहे. ठाणे-बेलापूर मार्गाच्या पूर्व बाजूस ७८ किलोमीटर परिसरात पसरलेली झोपडपट्टी वसाहत ही आज तीन लाखाच्या घरात गेली आहे. येथील तुर्भे स्टोअर, इंदिरानगर, हनुमाननगर, दिघा, चिंचपाडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर या लोकवस्तीत पालिकेच्या वतीने मोठय़ा प्रमाणात तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथील रुग्ण शोधून त्यांचे विलगीकरण करणे पालिकेला सोपे गेले आहे. एका करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २८ रुग्णांपर्यंत पालिकेच्या आरोग्य विभागाने संपर्क साधलेला आहे. त्यामुळे या झोपडपट्टी भागातून आता मिळणारे रुग्ण हे तीन ते चार इतकेच आहेत. हीच स्थिती ग्रामीण भागात असून ग्रामस्थांनी याबाबत स्थानिक पातळीवर काही नियमावली तयार केली आहे. त्यामुळे गाव व झोपडपट्टी भागात या आजाराचा प्रसार आता मंदावला आहे. वाढलेली रोगप्रतिकार शक्ती कारणीभूत असल्याचे आरोग्य विभागाने केलेल्या एका पाहणीत आढळून आले आहे.

एका इमारतीत तीन ते चार रुग्ण           

शहरी भागातील बैठी घरे आणि इमारतीमधील नागरिकांत करोनाचा प्रसार होण्याचे प्रमाण जास्त आहे. एका इमारतीत तीन ते चार रुग्ण आढळून आल्यानंतर ही संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. टाळेबंदी शिथिल करण्यात आल्यानंतर सर्वसामान्य वसाहतीतील रहिवासी कामकाजासाठी बाहेर पडण्याचे प्रमाण वाढल्याने रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे, मात्र झोपडपट्टी व ग्रामीण भागापेक्षा हे प्रमाण जास्त आहे.

प्रयोगशाळेत हद्दीबाहेरील नमुने बंद

नवी मुंबई : शहरातील वाढता करोना प्रादुर्भाव नियंत्रणात आण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठकीत केलेल्या सूचनांप्रमाणे महापालिका प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. जास्तीत जास्त करोना चाचण्या करण्याचे ठरविले आहे. यासाठी नेरुळ येथील प्रयोगशाळेत आता हद्दीबाहेरील नमुणे तपासणीसाठी घेण्यात येणार नसून पूर्ण क्षमतेने शहरातील चाचण्यांवर भर दिला जाणार आहे.

ठाणे जिल्‘ाात ठाणे शहरासह इतर महापालिका हद्दीत करोना प्रादुर्भाव कमी होत असला तरी नवी मुंबईत रुग्णसंख्या वाढत असून उपचार घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र मृत्युदर आटोक्यात आहे. तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्‘ाातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. यात नवी मुंबई व कल्याण-डोंबिवली शहरात अद्यापही करोना संसर्ग वाढत असल्याने उपाययोजनांबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार पालिका प्रशासनाने नियोजन केले आहे.

शहरात नुकतीच नेरुळ येथे एक अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. या प्रयोगशळेत दिवसाला एक हजार करोना चाचण्यांची क्षमता असून ती दिवसरात्र सुरू असते. ४ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या प्रयोगशाळेत पालिका हद्दीबरोबर ठाणे व पनवेल येथीलही चाचण्यांचे नमुने तपासणी केली जात होती. आता शहरातील चाचयांचे प्रमाण वाढत असून ते दिवसाला ९७० पर्यंत गेले आहे. त्यामुळे आता पालिका प्रशासनाने  या  प्रयोगशाळेत पालिका हद्दीतीलच रुग्णांच्या चाचण्यांना  प्राधान्य देण्यात येणार आहे.

नेरुळ येथील मीनाताई ठाकरे रुग्णालयातील प्रयोगशाळा  ही २४ तास सुरू असते. १ हजार क्षमतेच्या या प्रयोगशाळेत ९७० चाचण्या होत आहेत. त्यामुळे ती शहरासाठी उपयुक्त ठरत आहे. करोनाचे तात्काळ निदान होत असल्याने उपचारही तात्काळ मिळत आहेत. त्यामुळे मृत्युदर कमी होण्यास मदत होत असल्याचे मत अतिरिक्त आयमुक्त सुजाता ढोले यांनी व्यक्त केले.

प्रयोगशाळा सुरू होण्यापूर्र्वीच्या चाचण्या

२५०७       प्रतिजन

३५,२०८    आरटीपीसीआर

प्रयोगशाळा सुरू झाल्यानंतर चाचण्या

७१,६३८         प्रतिजन

४८,३८९         आरटीपीसीआर

१,२०,०५७      एकूण चाचण्या

प्रयोगशाळेची प्रतिदिन चाचण्यांची क्षमता दिवसाला एक हजार आहे. ती शहरातील रुग्णांमुळेच पूर्ण होत असल्याने शहराबाहेरील रुग्णांच्या करोना चाचण्या तूर्तास बंद करण्यात येत आहेत.

—अभिजीत बांगर, महापालिका आयुक्त