लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : रेल्वे सेवा हळूहळू पूर्ववत होत असल्याने नवी मुंबई महापालिका प्रशासनाने शहरातील रेल्वे स्थानकांवर करोना चाचणी केंद्रे उभारण्याचे नियोजन केले आहे. सोमवारपासून वाशी, नेरुळ व बेलापूर रेल्वे स्थानक परिसरांत ही सुविधा उपलब्ध करण्यात आली असून पहिल्या दिवशी साडेतीनशे प्रवाशांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या.

वाढत्या करोना रुग्णांमुळे महापालिका प्रशासनाने जास्तीतजास्त करोना चाचण्या करण्याचे ठरविले आहे. यासाठी  रेल्वे स्थानक परिसरात करोना चाचणी केंद्र उभारण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने केले होते. यासाठी सिडकोकडे परवानगी मागितली होती. सिडकोने वाशी, बेलापूर व नेरुळ स्थानकात पहिल्या टप्प्यात परवानगी दिल्यानंतर पालिकेने या ठिकाणी सोमवारपासून चाचणी केंद्रे सुरू केली आहेत. जास्तीतजास्त चाचण्या करून करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वे प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिका आयुक्तांनी केले आहे.