वाढत्या करोना रुग्णसंख्येला वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्याचा पालिका प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असताना सोमवारी पहाटे सहा वाजता केवळ एक तास पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा पालिका क्षेत्रात उपलब्ध आहे. या मोबाईल संदेशाने पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची झोपच उडून गेली. त्यानंतरच्या दोन तासात ऑक्सिजनची गरज असलेला साठा उपलब्ध करण्याची तारेवरची कसरत आयुक्तांनी पार पाडली.

मात्र शेवटच्या तासापर्यंत ऑक्सिजनची तजवीज न करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच झापलं. या काळात करोना रुग्णांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या एकाही अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही अशी समज आयुक्तांनी यावेळी दिली. वैद्यकीय कर्मचारी वर्ग कमी पडत असल्याने आणखी एक हजार कंत्राटी कामगारांच्या भरतीला आयुक्तांनी हिरवा कंदील दाखविला आहे.

नवी मुंबईत करोना रुग्णांची संख्या कमी जास्त होत आहे मात्र सरासरी एक हजार रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. कोविड काळजी केंद्रात रुग्णांची आस्थेने काळजी केली जात असल्याने वाशी येथील कोविड काळजी केंद्रात दाखला मिळावा यासाठी अनेक ठिकाणाहून रुग्णांचा आग्रह सुरू आहे. त्यासाठी प्रशासनावर विविध प्रकारे दबावदेखील आणला जात असून ओळखीपाळखीच्या रुग्णांच्या नातेवाईकांची संख्या वाढली आहे.

या रुग्णांमध्ये ऑक्सिजन व प्राणवायू रुग्णशय्याची देखील आवश्यकता भासत आहे. त्यामुळे पालिकेने दिवसाला तीन हजार क्युबिक ऑक्सिजन लागेल याची व्यवस्था करून ठेवलेली आहे. नवी मुबंईतील औद्योगिक वसाहतीत काही ऑक्सिजन पुरवठा करणारे कारखाने आहेत मात्र इच्छा असूनही ते नवी मुंबईतील रुग्णालयांना अधिकचा ऑक्सिजन पुरवठा करू शकत नाही. राज्य शासनाने येथील पुरवठाधारकांना ८० टक्के राज्यात पुरवठा करण्याचे आदेश दिले असून नवी मुंबईतील हे पुरवठादार मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल या आजूबाजूच्या शहरांना देखील ऑक्सिजन पुरवठा करीत आहेत.

सोमवारी पहाटे सहाच्या सुमारास आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मोबाइलवर एक संदेश झळकला. केवळ एक तास पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा उपलब्ध आहे. ऑक्सिजन व्यवस्थापन पाहणाऱ्या अधिकाऱ्याचा हा संदेश होता. ऑक्सीजन अभावी मुंबई, वसई, विरार येथे काही रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे केवळ एक तास ऑक्सिजन साठा या संदेशाचे गांर्भीय आयुक्तांनी ओळखले. ऑक्सिजन संपले तर शहरात हाहाकार माजण्याची शक्यता होती. आयुक्त बांगर यांनी यासाठी आरोग्य विभाग तसेच थेट पुरवठादारांशी संपर्क साधला. पुरवठादारानेही तात्काळ अशा आणीबाणीच्या काळात तात्काळ पुरवठा करण्याची खात्री दिली. पुरवठा दाराच्या वाहनाची वाट पाहणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना नंतर आयुक्तांची तंबी मिळाल्याने पालिकेचे वाहन पाठवून हा साठा तात्काळ उपलब्ध करण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला मात्र शेवटच्या एक तासाची वाट पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना आयुक्तांनी झोपा काढत होतात का अशा शब्दात झापलं. वाढत्या रुग्णसंख्येमुळे वैद्यकीय कर्मचारी व अधिकारी थकले आहेत.