मास्क न घातल्यामुळे दंड भरण्यास नकार देणाऱ्या पनवेलमधील पिता-पुत्राविरोधात खांदेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पनवेल महानगरपालिकेतील स्वच्छता निरीक्षक आधिकाऱ्यांनी मास्क न घातल्यामुळे त्यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र, दंडाची रक्कम देण्यास पिता-पुत्रांनी नकार दिला आणि आधिकाऱ्याशी बाचाबाची केली.

स्वच्छता निरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ४ नोव्हेंबर रोजी पनवेलमधील सेक्टर ६ येथे असणाऱ्या अमन बेकरी येथे घडली आहे. पालिकेचे स्वच्छता निरीक्षक अजिंक्य हलाडे आणि त्यांचे सुपरवायझर संदीप कांबळे यांनी सार्वजनिक ठिकाणी व दुकानांमध्ये मास्क न घातलेल्या लोकांना एकत्र केले होते. यामध्ये त्यांना अमन बेकरीचे मालक आसिफ सिद्दीकी (वय-४३) आणि त्यांचा मुलगा अमन (वय १९) हे पिता-पुत्रा मास्क न घातलेले आढळले. पालिकेच्या आधिकाऱ्यांनी या दोघांना ५०० रुपयांचा दंड भरण्याची विनंती केली. या दोघांनीही दंड भरण्यास नकार दिला.

दंडावरुन अमन यानं पालिकेच्या स्वच्छता आधिकाऱ्याशी युक्तीवाद केला. यावेळी आसिफ पालिका आधिकाऱ्यावर चिडले. त्यानंतर त्यांनी स्वत:वर रॉकेल ओतून घेतलं आणि आयुष्य संपवण्याची धमकी दिली.