03 December 2020

News Flash

पनवेलकरांसाठी मेट्रोचे दिवास्वप्न

सिडकोकडून दोनशे कोटींची मागणी; पनवेल पालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज चर्चा

(संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

पनवेल : २०२४ पर्यंतचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पनवेलकरांसाठी दिवास्वप्न ठरण्याची शक्यता आहे. सिडकोने पनवेल महापालिकेकडे या प्रकल्पासाठी दोनशे कोटींची मागणी केली आहे. चार वर्षांत पालिकेला स्वत:ची परिवहन व्यवस्था उभारता आली नसून नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेचे अनुदानही देता आले नाही. आता दोनशे कोटी पालिका भरणार कशातून व मेट्रो प्रत्यक्षात अवतरणार कधी, असा प्रश्न पनवेलकर उपस्थित करीत आहेत.

मागील वर्षी पनवेल महापालिकेचे तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांनी मेट्रोचा विस्तार पनवेल शहरापर्यंत करण्याचा मानस व्यक्त केला होता. विद्यमान आयुक्तांनीही तसे संकेत दिले होते.

गुरुवारी (ता. १९) पालिकेची सर्वसाधारण सभा होत असून यात हा विषय चर्चेसाठी ठेवण्यात आला आहे. यात  नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्प कॉरिडर एकच्या मार्गिका दोन (तळोजा औद्योगिक वसाहत ते खांदेश्वर) आणि मार्गिका तीन

( पेणधर ते तळोजा   औद्योगिक क्षेत्र) यासाठी पनवेल पालिकेच्या आर्थिक सहभागातील सुमारे दोनशे कोटी रुपयांच्या तरतुदीला मंजुरी हा विषय आहे. सिडकोने हे दोन्ही प्रकल्प पनवेल पालिकेच्या स्थापनेपूर्वीच नियोजित केले होते. मेट्रोचा हा अधिभार पनवेलकरांवर टाकण्याचा कोणताही विचार त्यावेळ सिडकोने मांडलेला नव्हता. पनवेल पालिकेच्या तिजोरीत मालमत्ताकरातून वर्षांला पावणेतीनशे कोटी रुपये जमा होणार आहेत. मुळात मालमत्ताकराच्या थकीत वसुलीला नागरिकांनी विरोध केला आहे. त्यामुळे दोनशे कोटी रुपये पालिका देणार कुठून? हा प्रश्न आहे.

पनवेल पालिकेची स्थापना चार वर्षांपूर्वी झाल्यानंतर अद्याप नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. पनवेल शहर झपाटय़ाने वाढत असले तरी दळणवळणासाठी पुरेशा सेवा नाहीत. पालिकेची स्वत:ची सार्वजनिक परिवहन व्यवस्था नाही. नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमावर पनवेलकरांचा प्रवास सुरू आहे.

सिडकोने तीस वर्षांपूर्वी टाकलेली जलवाहिनी व मलनिस्सारण वाहिनी बदलता आली नाही. नाल्यांची स्वच्छता अद्याप झालेली नाही. रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. पनवेलकरांना दररोज भोगावी लागत आहे. त्यामुळे सिडकोने पहिल्यांदा पायाभूत सुविधा देण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पालिकेचे सदस्य सतीश पाटील यांनी केली आहे.

मार्गिका दोन

  • तळोजा औद्योगिक वसाहत ते खांदेश्वर
  • सहा स्थानके, लांबी : १.१२ किलोमीटर
  • स्थानकांची नावे : कासाडी नदी, कळंबोली नोड, कळंबोली सेक्टर १४, कळंबोली सेक्टर ४, कामोठे सेक्टर १०, खांदेश्वर रेल्वेस्थानक

मार्गिका तीन

  • पेणधर ते तळोजा औद्योगिक वसाहत
  • तीन स्थानके लांबी : ३.८७ किलोमीटर
  • स्थानकांची नावे  : कोयनावेळे गाव, औद्योगिक वसाहत १, औद्योगिक वसाहत २

मेट्रोचा वापर निवडणुकीसाठी 

बेलापूर ते खारघर आणि खारघर ते तळोजा मेट्रोला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी हिरवा कंदील दाखविला. त्यानंतर मेट्रोची चाचणीही घेण्यात आली. मात्र ते मेट्रोचे डबे पुन्हा खारघर व तळोजावासीयांना दिसले नाहीत. त्यामुळे मेट्रोचे स्वप्न फक्त निवडणुकीसाठी दाखवले जात असल्याचा आरोप होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2020 1:51 am

Web Title: panvel matro issue dd70
Next Stories
1 केवळ १,११२ उपचाराधीन रुग्ण
2 खारफुटीवर भराव
3 नवी मुंबईत ‘सोनचिखल्या’चा पाहुणचार
Just Now!
X