News Flash

ऐरोलीवरील ‘वर्चस्वा’चा वाद

कधीकाळी माजी मंत्री गणेश नाईक यांचे मानसपुत्र असलेले मढवी आता नाईक पुत्रांचे कट्टर शत्रू झाले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

अपशब्दावरून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये शुक्रवारी झालेल्या राडय़ाला ऐरोली विधानसभा मतदारसंघावरील वर्चस्वाची किनार आहे. राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक आणि शिवसेनेचे नगरसेवक एम. के. मढवी यांच्यात गेली चार वर्षे विस्तव जात नाही. मढवी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. कधीकाळी माजी मंत्री गणेश नाईक यांचे मानसपुत्र असलेले मढवी आता नाईक पुत्रांचे कट्टर शत्रू झाले आहेत.

नवी मुंबईच्या राजकीय पटलावर ऐरोली भाग हा एक धगधगता निखारा मानला गेला आहे. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ऐरोलीत अधूनमधून अशा घटना घडत असल्याचा अनुभव आहे. गेली आठ वर्षे हा भाग वरकरणी शांत वाटत असताना शुक्रवारी या भागातील वाद उफाळून चव्हाटय़ावर आला. त्यामुळे दोन्ही राजकीय पक्षांकडून बंदची हाक देऊन सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचा पराक्रम केला गेला.

रबाले पोलीस ठाण्यात अनेक गुन्ह्य़ांची नोंद असलेले नगरसेवक एम. के. मढवी यांनी मागील पालिका निवडणुकीत शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसेनेत उडी घेतली. माजी मंत्री गणेश नाईक यांनी ऐरोली सेक्टर पाचमधील माजी दिवगंत नगरसेवक पप्पू सावंत यांच्या निधनानंतर मढवी यांना उमेदवारी देऊन त्यांना राजकारणात आणले. मात्र, ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांच्या आमदारकीच्या दुसऱ्या कार्यकाळात मढवी यांचे नाईक कुटुंबीयांशी असलेले संबंध दुरावले. याच मतभेदातून मढवी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर एकेकाळी नाईक यांचे पट्टशिष्य म्हणून ओळखले जाणारे एम. के. मढवी हे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे यांच्या मर्जीतील म्हणून ओळखले जाऊ लागले. खासदारांशी असलेल्या या जवळीकीतूनच शुक्रवारी उद्घाटन समारंभात मानापमानाचे नाटय़ घडले.

वास्तूच्या उद्घाटनास येण्यास खासदार विचारे यांना उशीर होत असतानाही, त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व्हावे, असा मढवी यांचा आग्रह कायम होता. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले व गटनेते द्वारकानाथ भोईर या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र असा आग्रह धरला नाही. भोईर यांनी मढवी यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. मात्र, तरीही मढवी यांची शेरेबाजी सुरू होती. याच दरम्यान त्यांनी उद्गारलेल्या एका अपशब्दावरून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यातूनच हा वाद वाढला.

या वादाचे कारण तत्कालिक दिसत असले तरी, ऐरोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची मढवी यांची महत्त्वाकांक्षा याच्या मुळाशी असल्याची चर्चा आहे. मागील पालिका निवडणुकीत ऐरोलीतून आपल्या कुटुंबातील तीन नगरसेवक निवडून आणल्यानंतर मढवी यांच्या या इच्छेला धुमारे फुटले आहेत. ‘मातोश्री’तील पक्ष पदाधिकाऱ्यांशीही त्यांनी जवळीक वाढवली आहे. पक्षश्रेष्ठींच्या नजरेत येण्यासाठी त्यांची ही राडासंस्कृती रुजवण्याचे प्रयत्न शुक्रवारच्या घटनेने सुरू झाले असून यानंतर ऐरोलीत अशा प्रकारच्या अनेक घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वैभव नाईक यांची उडी

एम. के. मढवी आणि संदीप नाईक यांच्यातील पूर्ववैमनस्यातून पेटलेल्या या वादात गणेश नाईक यांचे पुतणे आणि भाजपचे गेल्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवार वैभव नाईक यांनीही उडी घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ऐरोलीत झालेल्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेले वैभव नाईक यांनी मढवी यांना आव्हान दिल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे. त्यामुळे वैभव नाईक यांच्या राष्ट्रवादीशी वाढत असलेल्या जवळीकीचीही चर्चा यानिमित्ताने रंगली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2019 3:13 am

Web Title: party workers of both parties clashed with disparagement
Next Stories
1 उद्घाटनाच्या श्रेयावरून शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये जुंपली
2 निवडणुकीपूर्वी प्रकल्पाच्या उद्घाटनांचा बार उडणार
3 रेल्वे स्थानकांवर तपासणी यंत्रणाच नाही
Just Now!
X