19 October 2019

News Flash

पोलिसांना सातव्या आयोगानुसार वेतन

८ ते २० हजारांची मासिक वाढ मिळाल्याने कुटुंबियांकडून समाधान

प्रतिनिधिक छायाचित्र

८ ते २० हजारांची मासिक वाढ मिळाल्याने कुटुंबियांकडून समाधान

पनवेल : नवी मुंबई पोलीस दलातील सुमारे तीन हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळाल्याने पोलीस कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आहे. सेवाज्येष्ठतेनुसार पोलीस शिपाई व नाईकांना सुमारे ८ ते ९ हजार रुपयांची वेतनात घसघशीत वाढ तर हवालदार ते सहा पोलीस उपनिरीक्षकांना १५ ते १८ हजार रुपयांची वाढ आणि पोलीस उपनिरीक्षकांनी १५ ते २० हजार रुपयांची वेतनवाढ मिळाल्याने पोलीस व त्यांची कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.

२०१६ सालापासून ही वेतनवाढ लागू करण्यात आली असून डिसेंबर २०१८ पर्यंतची वेतनवाढ ही भविष्यनिर्वाह निधी खात्यात प्रत्येक पोलिसाच्या जमा होणार आहे. या सर्व शुभवार्तेमध्ये पोलीस मुख्यालयात काम करणारे ८०० हून अधिक पोलिसांचे एप्रिल महिन्याचे वेतन त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. त्यामुळे आम्हाला कधी सातव्या वेतन आयोगाच्या नियमानुसार वेतन मिळणार याच्या प्रतीक्षेत ८०० पोलीस आहेत.

नवी मुंबईतील सुमारे २५ लाख नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुमारे चार हजार पोलीस कर्मचारी आहेत. २५ वर्षांपूर्वी या ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन करून नवी मुंबई पोलीस दलाचे स्वतंत्र आयुक्तालय सुरू करण्यात आले.

सध्या या दलातील निम्याहून अधिक पोलिसांना मिळालेल्या वाढीव वेतनामुळे या दलात आनंद आहे. २००७ साली नवी मुंबई पोलीस दलात दाखल झालेले पोलीस शिपाई यांना मूळ वेतन ३ हजार रुपये दिले जात होते. त्यानंतर या शिपाईंची पदोन्नती झाली त्यांना मार्च २०१९ पर्यंत १२ हजार मूळ वेतन होते. इतर भत्ते धरून या पोलीस नाईक यांना सुमारे ३१ हजार एकूण वेतन मिळत होते.

मे महिन्यात याच पोलीस नाईक यांना एकूण ४० हजार वेतन त्यांच्या खात्यात जमा झाल्याचा बँकेचा संदेश आला. त्यामुळे संबंधित नाईक यांचे व त्यांच्या कुटुंबीयांना हा मिळालेला सुखद धक्का होता. अशीच काहीशी परिस्थिती अनेक पोलिसांची आहे.

तलाठी, तहसीलदारांप्रमाणे वेतनश्रेणी द्या!

*  पोलीस दल हे शिस्तीचे खाते मानले जाते. या दलातील कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या चिरीमिरीविषयी सर्वाधिक चर्चा समाजात केली जाते. मात्र आम्हाला पुरेसे वेतन द्यावे अशी मागणी या दलातील अनेकांनी सातव्या वेतन लागू झाल्याच्या निमित्तानंतर व्यक्त केली आहे.

*  महसूल विभागातील तलाठी व तहसीलदार यांच्या वेतनश्रेणीप्रमाणे पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना वेतन मिळाले पाहिजे अशी मुख्य मागणी पोलिसांची आहे. तसेच महसूल विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांचे काम आठ तास आणि पोलीस हे बारा तास काम करतात हे पोलीस आवर्जून व्यक्त करतात.

*  एखाद्या बेपत्ता अथवा चोरीच्या गुन्ह्य़ाचा शोध करण्यासाठी पोलीस ठाण्याला महिन्याला अवघे १० ते २० हजार रुपये दिले जातात. मात्र ही रक्कम तुटपुंजी, असल्याने फिर्यादीकडून शोधकामासाठी वाहन व इतर सामुग्रीची अपेक्षा केली जाते.

First Published on May 14, 2019 4:14 am

Web Title: pay as per the seventh commission to navi mumbai police