कंत्राटदाराला पैसे न दिल्याने शीव-पनवेल महामार्गावर अनेक ठिकाणी काम अर्धवट

पादचाऱ्यांना शीव-पनवेल महामार्ग ओलांडता यावा, यासाठी बांधण्यात आलेल्या भुयारी मार्गाचे काम अर्धवटच सोडण्यात आल्याने त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत सायन-पनवेल टोलवेज प्राव्हेट लिमिटेड या कंपनीला महामार्गचे काम देण्यात आले होते. कंपनीने भुयारी मार्गाचे काम अर्धवट सोडल्यामुळे तिथे कचऱ्याचे ढीग साचले आहेत. काही भुयारी मार्गामध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. मार्गात विजेचे दिवे नसल्याने अंधाराचा गैरफायदा घेत गर्दुल्ल्यांची टोळकी जमत आहेत. शासनाकडून कंत्राटदाराला पैसे मिळत नसल्याने हे काम अर्धवट राहिले आहे.

या महामार्गचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाने २०११ मध्ये सायन पनवेल टोलवेज प्राव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आले. १ जानेवारी २०१५पासून या रस्त्यावर टोल सुरू झाला. पण भाजप सरकारने टोलमुक्त करण्याचा निर्णय घेतल्यांनतर सहा महिन्यांतच खासगी गाडय़ांना टोल बंद करण्यात आला. कंत्राटदारांचे पैसे हे शासनाने दिले नसल्याने कंत्राटदाराने न्यायलयात धाव घेतली आहे. शासनाकडून कंत्राटदाराला पैसे मिळत नसल्याने काम ठप्प झाले आहे. अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. यासंदर्भात सायन-पनवेल टोलवेज कंपनीचे व्यवस्थापक संजीत श्रीवास्तव यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

तळोजा येथे मासेविक्री

सायन-पनवेल महामार्गवरून तळोजाकडे जाणाऱ्या रस्त्यावर भुयारी मार्ग बांधून ठेवण्यात आला आहे. या भुयारी मार्गात पाणी साचले असून डासांची पैदास झाली आहे. भुयारी मार्गाच्या सुरुवातीलाच मातीचे ढीग साचले असून तिथे मासेविक्री सुरू असते. मासेविक्रेते आपले साहित्यही येथेच धुतात. त्यामुळे दरुगधी पसरते. या भुयारी मार्गाचा वापरच करण्यात येत नसल्याचे महिला रेश्मा भोर यांनी सांगितले.

 

शीव-पनेवल मर्गावरील भुयारी मार्गात पथदिवेच नाहीत. त्यामुळे येथून येणे-जाणे सुरक्षित वाटत नाही. अस्वच्छतेमुळे येथून जाणेच अशक्य झाले आहे. या भुयारी मार्गाऐवजी पादचारी पूल बांधले असते तर कदाचित त्यांचा वापर झाला असता.  – सागर कांबळे, नागरिक

सीबीडीत मद्यपींचा अड्डा

सीबीडी येथील एसबीआय कॉलनी येथे भुयारी मार्ग बांधण्यात आला आहे. या भुयारी मार्गाच्या बाजूला सार्वजनिक बांधकाम विभागानेच बस स्टॉपदेखील बांधला असून त्याचीसुद्धा दयनीय अवस्था झाली आहे. या भुयारी मार्गात पाणी साचले असून लाद्या निखळल्या आहेत. भिंतीचा वापर पत्रके लावण्यासाठी होत असून मार्गावर वेल पसरली आहे. भुयारी मार्गात अंधाराचे सम्राज्य पसरले असून तिथे मद्यपान सुरू असते. भुयारी मार्ग बांधण्यात आल्यापासून याचा कधी वापरच झाला नसल्याचे महिला प्रवासी प्राजक्ता काळे यांनी सांगितले.

नेरुळ येथे डबके

सायन-पनवेल मार्गावरील नेरुळ उड्डाणपुलाच्या खाली दोन भुयारी मार्ग बांधण्यात आले आहेत. या भुयारी मार्गामध्ये तीन फुटांपर्यंत पाणी साचते. त्यात डास आणि माश्यांची पैदास झाली आहे. पादचारी पुलाचे छप्पर उडाले आहे. भुयारी मार्गाच्या पायाऱ्यांपाशी  फेरीवाले पाण्याचे कॅन ठेवतात. भुयारी मार्गाचा वापर पत्रके लावण्यासाठी केला जात आहे. साचलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. भुयारी मार्ग असतानादेखील पादचारी उड्डापुलाच्या खालूनच रस्ता ओलांडतात.

खारघरमध्ये दरवाजे उखडले

खारघर येथील उड्डाणपुलाच्या खाली खारघर सर्कलजवळ दोन भुयारी मार्ग बांधण्यात आले आहेत. भुयारी मार्गाच्या समोरच खडी टाकण्यात आली आहे. मार्गाचे ग्रिलदेखील तोडून टाकण्यात आले आहे. पादचांऱ्याना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. या भुयारी मार्गामध्ये पाणी साचले असून या भुयारी मार्गत दिवे नाहीत.

उरण फाटा येथे कचराकुंडी

सायन-पनवेल मार्गावरील उरण फाटा येथील भुयारी मार्गाजवळ वाशीकडून पनवेलकडे जाणाऱ्या भागात खोदून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भुयारी मार्गामध्ये जाण्यात अडथळा येतो. अंधार पसरलेला असतो. साफसफाई करण्यात न आल्याने मार्ग अस्वच्छ झाला आहे. त्यामुळे दरुगधी येते. भुयारी मार्गाचा वापर गर्दुल्ले करतात.