नवी मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर अनेक सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू झाल्या असून यात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र व नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या बदलीची शक्यता आहे.

चार महिन्यांत नवी मुंबईत चार प्रमुख पक्षांसाठी प्रतिष्ठेची असलेली पालिका निवडणूक होणार असल्याने सरकार अनुकूल असलेले अधिकारी या प्रमुख प्राधिकरणांवर नियुक्त केले जाणार आहेत. पालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची नियुक्ती अलीकडेच झाली असून त्यांचे सर्वपक्षीय चांगले संबंध असल्याने ही बदली होणार नसल्याचे समजते.

मुख्यमंत्री कार्यालयात एक स्वतंत्र प्रधान सचिवांची आवश्यकता असल्याने सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांची मुदतपूर्व बदली करण्यात आली. त्यांच्या जागी दिल्लीतील महाराष्ट्र भवनाची धुरा सांभाळणारे लोकेश चंद्र यांची सिडकोसारख्या महत्त्वाच्या महामंडळात नियुक्ती करण्यात आली.

सिडकोत आल्यानंतर चंद्र यांनी गृहप्रकल्पांना चालना दिली असून दोन लाख घरांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यांचा हा निर्णय तसा काही विकासकांना देशोधडीला लावणारा आहे. त्यामुळे त्यांच्या बदलीसाठी काही विकासक देव पाण्यात ठेवून आहेत. सिडकोचे मुख्यालय बेलापूर असून कार्यक्षेत्र नवी मुंबई, पनवेल आणि उरण या क्षेत्रापुरते मर्यादित आहे, पण चंद्र यांचा कल सिडकोच्या मुंबई येथील कार्यालयात तळ ठोकून राहण्याकडे जास्त आहे. त्यामुळे त्यांना मुंबईतच ठेवण्यात यावे असा प्रस्ताव काही विकासकांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिलेला आहे. सिडकोत येऊन केवळ दीड वर्ष कालावधी लोटलेला असताना चंद्र यांच्या बदलीचे वारे वाहू लागले आहेत. याशिवाय नवी मुंबई पालिकेचे आयुक्त म्हणून प्रशासकीय वचक असलेले संजय कुमार यांची बदली आगामी पालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून महाविकास आघाडीतील घटक पक्ष करण्यात गुंतले आहेत.

बदल्यांचे समिकरण

* शिवसेनेने प्रतिष्ठेचे केलेले मुख्यमंत्रिपद पदरात पडल्याने दुसऱ्या क्रमांकाचे गृहमंत्रिपद हे राष्ट्रवादीच्या वाटय़ाला येण्याची शक्यता असून नवी मुंबईचे पोलीस आयुक्त पद हे पश्चिम महाराष्ट्रात जास्त काळ कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या पदरात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

* या दोन्ही महत्त्वाच्या पदांच्या बदलीबरोबरच नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदावरही गंडांतर येणार होते पण मिसाळ यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारून केवळ चार महिने झाल्याने या बदलीचा प्रस्ताव मागे पडला आहे.