29 October 2020

News Flash

विजेविना जनजीवन ठप्प

नोकरदारांचे हाल; मोबाइल, इंटरनेट सेवाही विस्कळीत

विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने ‘सीएनजी’ पंपही बंद होते. त्यामुळे रिक्षाचालकांनाच्या एक दिवस पंपावरच रांगेत गेला. (सर्व छायाचित्रे: नरेंद्र वास्कर)

नोकरदारांचे हाल; मोबाइल, इंटरनेट सेवाही विस्कळीत

नवी मुंबई : सोमवारी दिवसभर वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. मोबाइलचे नेटवर्क आणि इंटरनेट सेवाही ठप्प झाली. त्याचा फटका सध्या घरातून काम करणाऱ्या नोकरदार वर्गासह ऑनलाइनद्वारे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला. रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्यामुळेही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे हाल झाले. तर औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांनाही याचा मोठा फटका बसला आहे.

नवी मुंबई वीज खंडीत होण्याचा प्रकार  दिवसभर सुरू होता. अधूनमधून काही विभागात वीज खंडीत होत होती. सायंकाळीही नेरुळ विभागात वीज नव्हती. दिवसभर सुरू असलेल्या या प्रकारामुळे नवी मुंबईकर त्रस्त झाले होते.

सोमवारी सकाळी ७ ते १० वाजण्याच्या दरम्यान शहरातील सर्वच विभागांसह ठाणे बेलापूर आद्योगिक पट्टय़ातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे लोकल काही काळ बंद होती.  लोकल सेवा ठप्प झाल्याने ‘एनएमएमटी’ने २० जादा बस सोडल्या होत्या. त्यात विजेवर चालणाऱ्या बस बंद होत्या. आणखी बसचे नियोजन करेपर्यंत लोकल सुरू झाली. विजेवर चालणारी एकही बस बॅटरी चार्ज नसल्याने सोडता आली नाही. दुपारी एकनंतर विद्युतपुरवठा सुरू झाला, मात्र त्यानंतर परत काही विभागंत वीजपुरवठा खंडित झाला. संध्याकाळी पाचनंतर वीजपुरवठा सुरळीत झाला.

याचा सर्वात जास्त फटका औद्योगिक वसाहतीला बसला. यंत्रणा बंद पडल्याने प्रक्रिया सुरू असलेल्या उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम झाला. त्यात कर्मचारी बसून राहिल्याने त्याचा रोजगाराचा भरूदडही कारखान्यांना सोसावा लागल्याचे येथील कारखानदार विश्व कार्तिकेय यांनी दिली. वीज बंदमुळे कारखान्यांचे पाच ते सहा दिवसांचे नुकसान झाले आहे असेही त्यांनी सांगितले. कारखानदार किरण चुरी यांनी सांगितले की, पुढील अनेक दिवसांच्या मालाचा पुरवठा आता एक दिवस उशिरा करावा लागणार आहे. रात्रपाळीत काम केल्यावरही भरपाई भरून निघणार नाही.

आरोग्य सेवा सुरळीत

नवी मुंबई शहरातील आरोग्य सेवा मात्र सुरळीत सुरू होती असे पालिका प्रशासनाने सांगितले. वाशी येथील महापालिका रुग्णालयाचे अधीक्षक प्रशांत जवादे व नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयाचे कार्यकारी अधिकारी राहुल पेड्डेवाड यांनी रुग्णसेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे सांगितले.

ऑनलाइन परीक्षेत अडथळा

नवी मुंबईत सकाळी १०.३० च्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर ऑनलाइन शिक्षणात खोळंबा झाला. काहींच्या ऑनलाइन सहामाही परीक्षा सुरू असून त्यातही अडथळा निर्माण झाला. पेपर लिहून ते नेटवर्क नसल्याने अपलोड करता आले नाहीत. आलेली अडचण पाहता शाळेने कोणालाही तात्काळ पेपर पाठवा असे सांगितले नाही. वीज समस्या ही तांत्रिक अडचण होती. ती शाळा, विद्यार्थी व पालकही समजून घेतात, असे नेरुळच्या डीएव्ही शाळेच्या मुख्याद्यापक जॉयस कुरियन यांनी सांगितले.

‘वर्क फ्रॉम होम’ला सुट्टी

नवी मुंबई : मुंबई महानगर प्रदेशांना विद्युत पुरवठा करणाऱ्या कळवा-पडघा वाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सोमवारी पहाटे या भागात विद्युत पुरवठा अचानक खंडित झाला आणि एकच तारांबळ उडाली. गेले सात महिने घरातून काम करण्याची परवानगी अनेक कॉर्पोरेट कंपन्यांनी दिली आहे. अशा प्रकारे काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांवर सोमवारी सक्तीची सुट्टी घेण्याची वेळ आली. सर्वस्वी संगणकावर काम अवलंबून असणाऱ्या वर्क फ्रोम होम कर्मचाऱ्यांचे दोन तासांनंतर संगणक बंद झाले, तर

मोबाइलही रिचार्ज होऊ न शकल्याने त्यांना काम बंद करावे लागले. ज्यांच्या घरी जनरेटर किंवा इन्व्हर्टर होते त्यांनी काही काळ कामाची जबाबदारी सांभाळली, पण ही यंत्रणादेखील दुपारनंतर कोलमडून पडल्याचे चित्र होते.

नवी मुंबईत घरातून काम करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. टीटीसी औद्योगिक वसाहतीतील मोठमोठय़ा आयटी कंपन्यांनी मार्चपासून कर्मचाऱ्यांना लॅपटॉप देऊन घरातून काम करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे टाळेबंदी शिथिलीकरण झाल्यानंतही अनेक कंपन्यांचे कर्मचारी हे घरातून काम करीत आहेत.

काही तासांत विद्युत पुरवठा पूर्ववत होईल या आशेवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी दुपारनंतर मात्र संगणक, लॅपटॉप बंद करून सुट्टीचा आनंद घेतला. मुंबईत काही ठिकाणी विद्युत पुरवठा पूर्ववत झाला, पण नवी मुंबई, पनवेल, उरण क्षेत्रातील बत्ती रात्री उशिरापर्यंत गुल होती. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने अनेक कंपन्यांचे परदेशी कंपन्याबरोबर सुरू असलेला संवाद व व्यवहार काही काळाकरिता ठप्प झाल्याचे चित्र होते. अनेक मोबाइल टॉवरसाठीदेखील विद्युत पुरवठय़ाची आवश्यकता भासत असते. त्यामुळे मोबाइल व इंटरनेट सुविधेवरदेखील परिणाम झाल्याचे चित्र होते.

नवी मुंबईत स्थानिक पातळीवर कोणतीही तांत्रिक समस्या झाली नव्हती. मात्र दिवसभर अधून-मधून वीज जात होती.

-राजराम माने, कार्यकारी अभियंता , वाशी विभाग

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2020 1:10 am

Web Title: power outage in navi mumbai hit normal life zws 70
Next Stories
1 शहरबात :  करोनाकाळातील क्रिकेटप्रेम?
2 वातानुकूलित बसकडे प्रवाशांची पाठ
3 डाळी महाग!
Just Now!
X