खासगी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आल्याने नागरिकांची अडचण

राज्यात मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेलापूर येथील कोकण भवन इमारतीतील तसेच आजूबाजूच्या सर्वच शासकीय कार्यालयाबाहेरील वाहनतळांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोकण भवन इमारत परिसरात शासकीय वाहनाव्यतिरिक्त प्रवेश बंद करण्यात आल्याने अभ्यागतांनी वाहने उभी करायची कुठे असा प्रश्न पडला आहे. रस्त्यात वाहने उभी केल्यास ती तात्काळ उचलून नेली जात आहेत.

नवी मुंबईचे सीबीडी (सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट) हा विभाग सर्वच शासकीय निमशासकीय संस्थांच्या मुख्य कार्यालयाचा आहे. मुंबईतील  मंत्रालयात राज्याच्या कानाकोपऱ्यातून धडकणारी गर्दी कमी व्हावी यासाठी मंत्रालय या ठिकाणी हलविण्याचा शासनाचा प्रस्ताव होता मात्र त्याला स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध केल्याने हे मंत्रालय स्थलांतर रद्द करण्यात आले. त्याऐवजी मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे विभागीय कार्यालये म्हणून या ठिकाणी कोकण भवन हे मिनी मंत्रालय उभारण्यात आले आहे. या ठिकाणी सर्व प्रकारची ७० शासकीय कायालये आहेत. यापूर्वी या कार्यालयात अभ्यागतांच्या वाहनांना प्रवेश होता, मात्र काही दिवसांपासून या ठिकाणी केवळ शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वाहनांसाठी प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे विविध शासकीय कामासाठी येणाऱ्या जेष्ठ नागरिक तसेच अपंग अभ्यागतांनी आपली वाहने उभी करायची कुठे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या भागात सिडको, नवी मुंबई पोलीस मुख्यालय, आरबीआय, कपास, न्यायालय अशी अनेक शासकीय कार्यालये आहेत. या कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांना वाहनतळ व्यवस्था नसल्याने त्यांची पंचाईत होऊ लागली आहे. मोकळ्या रस्त्यावर गाडी उभी केल्यास ती माघारी येईपर्यंत वाहतूक पोलिसांनी उचलून नेलेली असल्याचे दिसून येते. कोकण भवनमध्ये केवळ १०० चारचाकी व २१८ दुचाकी वाहनांची क्षमता आहे. याच इमारतीसमोर सिडकोचे सशुल्क वाहनतळ आहे, पण तेथे शुल्क द्यावे लागत असल्याने अभ्यागत टाळतात. याच इमारतीच्या मागील बाजूस मोकळी जागा आहे, पण त्या ठिकाणी मेट्रोचे काम सुरू असल्याने वाहनं उभे करण्यास परवानगी नाही.

पालिकेचा प्रस्ताव धूळखात

नवी मुंबई पालिकेने या सर्व परिसरासाठी एक बहुमजली वाहनतळ उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यासाठी सात कोटी रुपयांची तरतूददेखील करण्यात आलेली आहे; पण हा प्रस्ताव गेली चार वर्षे धूळखात पडला आहे. त्यामुळे पार्किंगची समस्या गहन बनली आहे.

सीबीडीचा आराखडा करताना वाहनांची संख्या आणि पार्किंग यांचा अभ्यास केला नाही. त्यामुळे आज वाहन सुरक्षित ठेवण्याची एकही जागा नाही. ज्या आहेत त्या शासकीय कार्यालयांच्या आहेत. त्यामुळे वाहने चोरी व उचलून नेण्याचे प्रकार सर्रास घडत असतात.

-अशोक मुळ्ये, रहिवाशी, आर्टिस्ट व्हिलेज, सीबीडी.