नवी मुंबईतील १७ पैकी ८ स्थानके अधीक्षकाविना

नवी मुंबईत सिडकोने बांधलेल्या भव्य आणि आधुनिक रेल्वे स्थानकांची स्तुती नेहमीच केली जाते, परंतु या स्थानकांतील सुरक्षा आणि व्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या रेल्वे स्थानक अधीक्षकांची नियुक्तीच करण्यात आलेली नाही. नवी मुंबई शहरातील वाशी ते पनवेल या हार्बर मार्गावर व वाशी ते ठाणे या ट्रान्स हार्बर मार्गावर अनेक रेल्वे स्थानके प्रशिक्षित रेल्वे स्थानक अधीक्षकाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकात अनुचित प्रकार वा दुर्घटना घडल्यास दाद मागायची कोणाकडे, असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे.

नवी मुंबई शहर रेल्वेने मुंबईशी जोडले गेले आहे. आता हीच सेवा उरणपर्यंत पोहोचवण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. हार्बर रेल्वेमार्गावरील १० रेल्वे स्थानके नवी मुंबईच्या हद्दीत येतात. त्यापैकी ५ रेल्वे स्थानकांत रेल्वे अधीक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे, तर उर्वरित ५ स्थानकांवर तिकीट काउंटरवरील कर्मचाऱ्यावरच स्थानक अधीक्षकाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ट्रान्स हार्बर मार्गावर ७ रेल्वेस्थानके आहेत. त्यातील ४ स्थानकांमध्ये अधीक्षक आहे. तर ३ स्थानकांवर अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांवर अधीक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

रेल्वे परिचलन, तिकीट, दुर्घटना, रेल्वे खोळंबा यासंदर्भात प्रवाशांच्या गैरसोयींकडे लक्ष देण्याची जबाबदारी रेल्वे स्थानक अधीक्षकावर असते. त्यांची नेमणूक न करण्यामागे अपुरे कर्मचारी, हे कारण दिले जात आहे. या मार्गावरील अनेक स्थानकांतील तिकीट खिडक्याही कर्मचाऱ्यांअभावी अनेकदा बंद असतात. त्यामुळे लांबलचक रांगा लागलेल्या असतात. स्थानक अधीक्षकच नसल्यामुळे समस्या कोणाकडे मांडाव्यात, असा प्रश्न प्रवाशांना पडतो.

नवी मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांत फेरीवाले, गर्दुल्ले, अपघात, रेल्वेचा खोळंबा अशा समस्या उद्भवतात. अशा वेळी तिकीट खिडकीवरील ज्या कर्मचाऱ्याकडे अधीक्षकाची अतिरिक्त जबाबदारी आहे, तो खिडकी सोडून इतर कामे करण्यासाठी जाऊ शकत नाही. त्यामुळे रेल्वे स्थानक अधीक्षकांची नेमणूक करावी व त्यासाठी आवश्यक तेवढी कर्मचारी भरती करावी, अशी मागणी होऊ  लागली आहे.

स्थानक अधीक्षकांअभावी

* डिसेंबरअखेरीस नेरुळ-उरण रेल्वेसाठी घेण्यात आलेल्या मेगाब्लॉक व ट्रॅफिक ब्लॉकच्या वेळी सलग १० दिवस रेल्वेप्रवाशांचे हाल झाले.

* जुईनगर व नेरुळ रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, तेव्हा बेलापूर स्थानकाच्या पुढे पनवेलपर्यंत जबाबदार स्वतंत्र रेल्वे स्थानक अधीक्षक नसल्यामुळे नीट उद्घोषणाही झाली नव्हती.

* घणसोली स्थानकात गाडीचे कपलिंग तुटले त्या वेळीसुद्धा कोपरखैरणे स्थानकातून मदत पोहोचवावी लागली.

* मानसरोवर जवळही समस्या निर्माण झाल्यानंतर स्थानक अधीक्षक नसल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

पश्चिम रेल्वेवर मात्र वेगळे चित्र

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर रेल्वे स्थानक अधीक्षकांची व कर्मचाऱ्यांची वानवा असताना पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरारदरम्यानच्या सर्वच्या सर्व २९ रेल्वेस्थानकांवर रेल्वे स्थानक अधीक्षक किंवा साहाय्यक अधीक्षक आहे.

स्थानकांतील स्थिती

ट्रान्स हार्बर मार्गावरील घणसोली, रबाळे, ऐरोली या स्थानकांत स्वतंत्र स्टेशन अधीक्षक नाहीत. तर वाशी, तुर्भे, कौपरखैरणे, ठाणे येथे स्वतंत्र स्टेशन अधीक्षक आहेत.

नवी मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांवर अत्याधुनिक सुविधा आहेत. काही स्थानकांत रेल्वे स्थानक अधीक्षकाची नेमणूक केलेली नाही. एका कर्मचाऱ्यावर विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. स्वतंत्र रेल्वे स्थानक अधीक्षकाच्या नेमणुकीबाबत विचारविनिमय करण्यात येईल.

– सुनील उदासी, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे 

पश्चिम रेल्वेमार्गावर चर्चगेट ते विरारदरम्यान असलेल्या सर्वच २९ रेल्वे स्थानकांवरील कारभार सांभाळण्यासाठी रेल्वे स्थानक अधीक्षक किंवा साहाय्यक रेल्वे अधीक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे.

– रवींद्र भाकर, जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

हार्बर रेल्वेमार्गावरील वाशी ते पनवेल स्थानकादरम्यान सानपाडा, सीवूड, खारघर,मानसरोवर, खांदेश्वर या पाच स्थानकांत स्वतंत्र रेल्वे स्टेशन अधीक्षक नाहीत तर वाशी, जुईनगर, नेरुळ, बेलापूर, पनवेल या स्थानकात स्वतंत्र रेल्वे स्टेशन अधीक्षक आहेत.