पावसाने तीन ते चार दिवसांपासून दमदार हजेरी लावल्याने उरण तालुक्याला पाणीपुरवठा करणारे रानसई धरण भरून वाहू लागले आहे. यामुळे पाणीटंचाईचे संकट दूर झाले असून पावसाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरीही आनंदले आहेत.  कडक उन्हामुळे उरण तालुक्यातील २६०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील भात पिकाची स्थिती गंभीर झाली होती.  पिके करपू लागली होती. त्यामुळे कष्ट करून पिकविलेली शेती हातची जाण्याची भीती निर्माण झाली होती, असे खोपटे येथील शेतकरी अनंत ठाकूर यांनी सांगितले. मात्र दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेतीला पाणी मिळाल्याने ही पिके वाचण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. रानसई परिसरात आतापर्यंत ९३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून ११६.६ इंच क्षमतेचे रानसई धरण भरून वाहू लागल्याची माहिती एमआयडीसीचे अधिकारी एम. के. बोधे यांनी दिली आहे.