लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : करोना प्रादुर्भावामुळे या वर्षी पालिकेचे उत्पन्न घटले असून निम्मीच करवसुली झाली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने थकीत मालमत्ता करवसुलीसाठी गेल्या वर्षी राबविलेल्या अभय योजनेला मुदतवाढ दिली आहे. १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी असे दोन महिने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे थकीत मालमत्ताधारकांना दिलासा मिळाला आहे.

नवी मुंबई महापालिका आर्थिकदृष्टय़ा सक्षम आहे. पालिकेला देशपातळीवर सलग सहा वर्षे आर्थिक स्थितीचे ट्रिपल प्लस मानांकन मिळाले आहे. तसेच पालिकेकडे ठेवीसुद्धा आहेत. मात्र दुसरीकडे आर्थिक स्थिती स्थिर ठेवण्यासाठी पालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत असलेल्या एलबीटी व मालमत्ता करवसुलीवर लक्ष दिले आहे. या वर्षी करोना स्थितीमुळे मालमत्ता कराची वसुली निम्म्यावर आली आहे. त्यामुळे गेल्या वर्षी थकीत मालमत्ता करवसुलीसाठी १ डिसेंबर ते ३१ डिसेंबपर्यंत ‘अभय योजना’ लागू करण्यात आली होती. याला आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. थकीत मालमत्ता करधारकांना दंडात्मक रकमेवर ७५ टक्केपर्यंत सूट मिळणार आहे.

या योजनेंतर्गत दोन महिन्यांच्या कालावधीत थकबाकीदारांनी मालमत्ता कराची संपूर्ण थकीत रक्कम अधिक २५ टक्के दंडात्मक रक्कम भरणा केल्यास ७५ टक्के दंडात्मक रक्कम माफ होणार आहे. सदर रक्कम एकाच वेळी भरणा करावी लागणार आहे.

अभय योजनेचा लाभ घेण्याकरिता महानगरपालिकेच्या ६६६.ल्लेू.ॠ५.्रल्ल या वेबसाइटवर तसेच सर्व आठ विभाग कार्यालये आणि संलग्न भरणा केंद्रांवर यासाठी अर्ज उपलब्ध केले जाणार आहेत. जाहीर केलेल्या अभय योजनेच्या कालावधीत आता कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे. अभय योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर प्रचार, प्रसिद्धी केली जाणार असून त्याकरिता विविध माध्यमांचा उपयोगही केला जाणार आहे असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी दिली.

मालमत्ताकर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असून त्यामधूनच नागरी सेवासुविधांची परिपूर्तता केली जाते. त्यामुळे सदर अभय योजनेचा लाभ घेत थकबाकीदारांनी शहर विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहन पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.  यामुळे थकबाकीदार मालमत्ताधारकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

मालमत्ता करवसुली

२०१९-२० : २४४ कोटी

२०२०-२१ : १४७ कोटी