रस्त्याची उंची वाढल्याने नेरुळ, खारघर आणि कोपरा येथे अडथळा

 नवी मुंबई पारसिक डोंगराच्या कडी कपाऱ्यातून येणारे पावसाळ्यातील पाणी ठाणे खाडीच्या पात्रात झेपावत असताना या दोघांच्या मध्ये पाच वर्षांपूर्वी पुनर्बाधणी करण्यात आलेले शीव-पनवेल मार्गातील काँक्रीटीकरणदेखील पाणी साचण्यास कारणीभूत असल्याचे काही अभियंत्याचे मत आहे. कमी पावसातदेखील या मार्गावरील खारघर परिसरात पाणी भरत असल्याचे दिसून येत आहे.

शीव-पनवेल मार्गाची होणारी दुरवस्था पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘बांधा वापरा हस्तांतरण करा’ या धर्तीवर मानखुर्द ते पनवेल या २२ किलोमीटर मार्गाचे पाच वर्षांपूर्वी काँक्रीटीकरण केले. त्यासाठी शीव-पनवेल टोलवेज कंपनीने एक हजार २०० कोटी रुपये खर्च केल्याचे समजते. हा आकडा न दोन हजार कोटीपर्यंत फुगविण्यात आला होता. काँक्रीटीकरण करताना या मार्गात सहा उड्डाणपूल बांधण्यात आले असून त्यांच्यावर काँक्रीटीकरण न करता डांबरीकरण करण्यात आले होते. हे डांबरीकरण पावसाळ्यात वाहनचालकांना चांगलेच त्रासदायक ठरत असल्याने यंदा या पुलांवरही काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे २२ किलोमीटरच्या मार्गावर सर्वत्र काँक्रीटीकरण झाल्याने रस्त्याची उंची पूर्वीपेक्षा वाढली आहे.

डोंगरातून अथवा जवळच्या शहरी भागातून येणारे पाणी वाहून जाण्यासाठी ठिकठिकाणी पावसाळी नाल्यांची निर्मिती करणे आवश्यक होते पण रस्ता बांधकाम कंपनीने ती केवळ काही मोजक्याच्या ठिकाणी केली आहे. त्यामुळे नेरुळ, खारघर आणि कोपरा भागात डोंगरातून येणारे पाण्याला खाडीकडे जाण्यास वाव मिळत नसल्याने रस्त्यावर साचत आहे. पांडवकडय़ातील पाण्यालाही खाडीकडे जाण्यास जागा न मिळाल्याने चार दिवसांपूर्वी हा परिसर जलमय झाला. त्यात कोपरा येथे बांधण्यात येणाऱ्या पुलामधील नाल्यामध्ये मोठय़ा प्रमाणात गाळ, प्लास्टिक आणि झाडे अडकल्याने हे पाणी रस्त्यावर आल्याचे स्पष्ट झाले आहे. नवी मुंबईत चार दिवसांपूर्वी पडलेला पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त असल्याने सर्वत्र पाणी साचल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र शीव-पनवेल मार्गावरील मोठय़ा प्रमाणात करण्यात आलेले काँक्रीटीकरणदेखील या मार्गावर कमी पावसात पाणी साचण्यास कारणीभूत ठरत असल्याचे सिडकोतील अभियंत्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.