पाचवी ते दहावीचे वर्ग सुरू करण्याची तयारी

नवी मुंबई : १६ जानेवारीपासून नववी व दहावीची शाळा सुरू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने पुढे ढकलला होता. आता १ फेब्रुवारीपासून पाचवी ते दहावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला असून तसे पत्र पालिका प्रशासनाने काढले आहे.

शासनाने पहिल्या टप्प्यात नवीवी व दहावीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील करोना परिस्थिती पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर १६ जानेवारीपासून शाळा सुरू होतील असे सांगण्यात आले होते. मात्र हा आदेशही पुढे ढकलण्यात आला होतो.

दरम्यान पालिकेच्या १८ शाळांपैकी तीन ते चार शाळांत दहावीचे वर्ग सुरू झाले होते.  याबाबत माहिती घेतली असता, दहावीच्या विद्यार्थ्यांना काही अडचणी येत असल्याने त्या सोडविण्यासाठी काही विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्यात येत असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र यामुळे इतर शाळांच्या पालकांत संभ्रम वाढला आहे.  याबाबत पालिका आयुक्तांना जिल्हाधिकाऱ्यांचे पुढील आदेश मिळेपर्यंत शाळा बंदच राहतील, असे सांगितले होते. १ फेब्रुवारीपासून शहरातील पाचवी ते  दहावीचे वर्ग सुरू करण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.  पाचवी ते दहावीपर्यंत नवी मुंबईत २५ हजार विद्यार्थी आहे.