ऋषीकेश मुळे

फेसाळलेल्या समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर धडकताना होणारा आवाज, सूं सूं करत अंग शहारायला लावणारा वेगवान वारा, निर्जन भागात दिवसाही ऐकू येणारी रातकिडय़ांची किर्र..किर्र.. आणि या सर्व आवाजांना कवेत घेऊन जाणाऱ्या ‘रॉयल एनफील्ड’च्या बुलेटचा मर्दानी सूर. ‘रॉयल एन्फील्ड’ने आयोजित केलेल्या ‘कोस्टल टूर २०१९’मध्ये मुंबई ते गोवा-अगोंदापर्यंतच्या प्रवासाची ही शब्दकथा.

‘रॉयल एन्फील्ड’ कंपनीकडून दरवर्षी ‘कोस्टल टूर’चे आयोजन करण्यात येते. जगभरातील निवडक बाइकप्रेमींना सोबत घेऊन महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यापासून कन्याकुमारीपर्यंत जाणारी ही सफर म्हणजे दुहेरी आनंदच. एकीकडे रॉयल एन्फील्डच्या तगडय़ा पण सौष्ठवी बुलेटची स्वारी करण्याचा अनुभव तर दुसरीकडे देशाच्या पश्चिम किनारपट्टीचे दर्शन घेताना सागराच्या विशालतेची साक्ष पटवून देणारी अनुभूती. यंदा ही सफर नुकतीच पार पडली.  महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, दिल्ली, पंजाब, हैद्राबाद, केरळ आणि तामिळनाडू या देशांतर्गत ठिकाणांसह दक्षिण आफ्रिका, पॅलेस्टाइन या देशांतील निवडक बाइकस्वार ‘रॉयल एन्फील्ड’च्या दुचाकी घेऊन या सफरीत सहभागी झाले. २६ जानेवारी रोजी सर्व बाइकस्वारांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देण्यात आले. आणि २७ जानेवारी रोजी सकाळी नवी मुंबई येथून या सफरीला सुरुवात झाली. अंगावर दुचाकीसाठी आवश्यक असणारे गिअर चढवत, हाती राइडिंग ग्लोज आणि डोक्यात संरक्षणात्मक हेल्मेट घालत दुचाकीवर बसून सफरीला सुरुवात झाली. सर्वाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता.

नवी मुंबई, पनवेल, पेन, अलिबाग, काशीद, मुरुड, मंदाड, म्हसाळा आणि श्रीवर्धन असा पहिल्या दिवसाचा प्रवास झाला. या सफरीत ‘रॉयल एन्फील्ड’च्या वेगवेगळ्या प्रकारच्या दुचाकी चालवण्याची संधी मिळाली. पहिल्या दिवशी २०० किमी अंतर ‘हिमालयीन स्लीट’वरून पार केले. समुद्रकिनाऱ्याला लागून असलेल्या रस्त्यावरून दुचाकी चालवताना एक वेगळाच आनंद होता. इंजिन स्टार्ट केल्यावर येणारा बुलेटचा मर्दानी आवाज एक वेगळाच हुरूप आणतो. त्याच आवाजाने मनात एक स्वाभिमान जागृत होतो. नवी मुंबई ते श्रीवर्धन असा पहिल्या दिवसाच्या प्रवासात अनेक ठिकाणी समुद्राचे विलोभनीय दृश्य दिसले. एका बाजूला समुद्र दुसऱ्या बाजूला डोंगरमाळ आणि मध्ये थेट बुलेट गाडय़ांची रांग. सर्वात पुढे सफरीचा लीडर रायडर आर्जय प्रामाणिक तर सर्वात शेवटी पाठीमागे कोणी राहू नये म्हणून स्वीपर रायडर पंकज बेनीवाल हे दोघे.

दुसऱ्या दिवशी श्रीवर्धन, वेळस, केळशी, अंजर्ले, दापोली, दाभोळ, गुहागर, वेळणेश्वर, तवसाळ, जयगड आणि गणपतीपुळे असा ८५ किलोमीटरचा प्रवास. दुपारच्या वेळी बाइक चालवताना काहीसा थकवा यायचा, मात्र डोंगररांग पूर्ण केल्यानंतर समोर दिसणारे समुद्राचे विलोभनीय दृश्य मन प्रसन्न करायचे, संपूर्ण थकवा दूर होऊन रायडिंगसाठी आणखीन प्रोत्साहन मिळायचे. या प्रवासात काही ठिकाणी खाडी ओलांडण्यासाठी फेरी बोटींचाही आधार घ्यावा लागला. फेरी बोटी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना फेरी बोटीतून अस्ताला जाणारा सूर्य पाहताना एक वेगळाच आनंद प्रत्येक रायडरच्या चेहऱ्यावर दिसत होता.

तिसऱ्या दिवशी गणपतीपुळे, रत्नागिरी, विजयदुर्ग, देवगड, मीथुमंबुरी, कुणकेश्वर असा १३० किलोमीटरचा प्रवास झाला. समुद्राच्या किनारी ताज्या माशांवर ताव मारत, नारळाच्या माडीत विसावा घेत रायडर्सनी मनसोक्त पोटपूजाही केली. चौथ्या दिवशी कुणकेश्वर, मालवण, देवबाग, परुळे, वेंगुर्ला, शिरोडा, अरोंदा, आरमबोळ, मांर्देम, सिओलीम, व्ॉगाटोर, बागा, पंजीम आणि गोवा-अगोंदा असा २१५ किलोमीटरचा प्रवास झाला. या प्रवासात वाटेत गोव्यातील ‘रॉयल एन्फील्ड गॅरेज कॅफे’मध्ये रायर्डसनी विसावा घेतला. रॉयल एन्फील्ड या सुप्रसिद्ध कंपनीच्या उत्पादनांचे आजवरची अभिनव दुचाकींचे प्रदर्शनही या रॉयल एन्फील्ड गॅरेज कॅफेमध्ये पाहायला मिळाले.

प्रत्येक दिवशी रात्रीच्या वेळेस विसाव्यासाठी रॉयल एन्फील्डकडून राहण्याची सोय करण्यात आली होती. समुद्रकिनारीच करण्यात आलेली राहण्याची उत्तम सोय आनंद देणारी होती. हॉटेलिंग आणि जेवणाकरिता अरविंद सिंग यांच्या उत्तम नियोजनाची साथ लाभली. काही ठिकाणी समुद्रकिनाऱ्यासोबत गावपाडय़ातील-डोंगरदऱ्यातील ओबडधोबड रस्तेही होते. काही ठिकाणी दुचाकी चालवताना मोठी जोखीम घ्यावी लागे. मात्र यातही रायडिंगसाठी एक वेगळाच आनंद होता.  कायम लक्षात राहील अशी ‘समुद्रकिनारा सफर २०१९’ प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अनुभवावी अशी आहे. या सफरीत येणारा प्रत्येक दुचाकीस्वार एक ध्येय घेऊन आला होता. हे ध्येय होते, दुचाकीवरून एकटय़ाने प्रवास करण्याचे. नेहमीच्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून वेळ काढत रायडिंगची आवड जोपासत प्रत्येकजण राइड करत होता.

हिमालयीन स्लीट या दुचाकीतील ठळक वैशिष्टय़े

अ‍ॅल्युमिनीयम हॅन्डलबार

एखाद्या दूरवरच्या अंतरावर प्रवास करताना दुचाकीचालकाच्या हातांना मुक्त आराम मिळावा याकरिता या दुचाकीचे हॅन्डलबार अ‍ॅल्युमिनियम विथ क्रॉस ब्रेस आहेत. इतर बाइकप्रमाणे या बाइकमध्ये मात्र बाइक चालवताना हातांना कंटाळा किंवा अडथळा येत नाही.

हँन्डलबार एण्ड वेट्स

हे सीएनसी मशीन्ड हॅन्डलबार, हॅन्डलबारवरील व्हायब्रेशन कमी करते. त्यामुळे हॅन्डलबारला एक विशिष्ट वजन प्राप्त होऊन हॅन्डलबारला अतिरिक्त संरक्षण मिळते.

अ‍ॅल्युमिनीयम पॅनीयर २६ लीटर

मजबूत आणि जलरोधक अशा पॅनीयरची (वस्तू ठेवण्यासाठी दुचाकीसोबत दोन्ही बाजूला जोडलेले पेटारे) सुविधाही रॉयल एन्फील्डच्या हिमालयीन स्लीट बाइकला देण्यात आली आहे. दोन मिमी अ‍ॅल्युमिनियम पत्र्याचा वापर करून हे पॅनीयर तयार करण्यात आले आहे. प्रति २६ लिटर इतकी साठवण क्षमता असणाऱ्या या पॅनीयरला कुलपाचीही सुविधा देण्यात आली आहे.

इंजीन गार्ड लार्ज

हिमालयीन स्लीट या दुचाकीला लार्ज इंजिन गार्डची सुविधा पुरविण्यात आली आहे. यामुळे इंजिन अधिक सुरक्षित राहण्यासाठी मदत होते. इंजिनवरील कवच २२ मिलीमीटर स्टील टय़ूबमधून बनवण्यात आले आहे. विशिष्ट रासायनिक काळळ्या पावडरचा थर त्यावर असल्याने ते गंजत नाही आणि दीर्घकाळ चमक धरून ठेवते.

माझी इच्छा होती की ‘कोस्टल टूर’ ही राइड करायची, आणि ती मी पूर्ण केली. माझा पती आणि दोन लहान मुलांना माझा खूप अभिमान आहे. दोन लहान मुलांना त्यांची आई बाइक चालवते हे पाहून एक वेगळाच आनंद मिळतो. मी स्त्रियांना प्रोत्साहनात्मक व्याखाने देते. नवी मुंबई ते कन्याकुमारी असा प्रवास दुचाकीवरून करताना महिलांनी मनात आणले तर काहीही करू शकतात, हेही मला दाखवून द्यायचे होते.

– विंदा बाळ, सहभागी महिला रायडर

माझे या राइडचे यंदाचे दुसरे वर्ष होते. प्रत्येकाने ही राइड आयुष्यात एकदा तरी करायला हवी. स्वतच्या आवडीला आव्हान देणे गरजेचे आहे. रायडिंग हा निखळ आनंद आहे. रॉयल एन्फील्डमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक दुचाकीस्वाराची मनापासून काळजी घेण्यात येते.

– आर्जय प्रामाणिक, सफरीचा ‘लीड रायडर’