जनजागृतीपर गीते, पथनाटय़ांच्या माध्यमातून संदेश; महापालिकेमार्फत घरोघरी माहिती

संगीतप्रेमींना आपल्या सुरेल आवाजाने भुरळ पाडणारे गायक शंकर महादेवन हे नवी मुंबई महापालिकेचे सदिच्छादूत झाले आहेत. ते लवकरच स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र मिशनविषयी जनजागृती करणार आहेत. त्यांनी बुधवारी महापालिकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर राज्य सरकारने दिलेल्या आदेशाप्रमाणे १५ जुलै २०१५ पासूनच महापालिकेत स्वच्छ भारत अभियान या नव्या विभागाची निर्मिती करण्यात आली. नवी मुंबई शहर हागणदारीमुक्त व स्वच्छ शहर करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून महापालिकेने शंकर महादेवन यांना महापालिकेच्या स्वच्छता अभियानाचे सदिच्छादूत होण्यासंदर्भात प्रस्ताव ठेवला होता. त्याची माहिती घेण्यासाठी बुधवारी ते महापालिकेच्या मुख्यालयात आले होते. या वेळी त्यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांशी संवाद साधला. महापालिकेच्या स्तुत्य उपक्रमाचा भाग व्हायला आवडेल, असे महादेवन यांनी सांगितले.

झोपडपट्टीत आणि गावठाण

भागात उघडय़ावर शौचास जाणाऱ्यांविरोधातील मोहीम तीव्र केली जाणार आहे. वैयक्तिक स्वच्छतागृहे, सार्वजनिक स्वच्छतागृहे व सामूहिक स्वच्छतागृहे बांधण्याची प्रक्रिया वेगात सुरू आहे. १११ पैकी ८९ प्रभाग हागणदारीमुक्त केल्याची घोषणा महापालिकेने केली आहे.

ओला-सुका कचरा वेगळा करण्याचे प्रशिक्षण देणारी शिबिरेही घेण्यात आली आहेत.

जनजागृतीचे स्वरूप

पुढच्या काही दिवसांत शंकर महादेवन महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून स्वच्छ नवी मुंबईचा संदेश देताना दिसतील. ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे आणि स्वच्छतेचे धडे देण्यासाठी शंकर महादेवन यांच्या सुमधुर आवाजात जनजागृतीपर गीत तयार करणार आहेत. प्लास्टिकबंदी, घनकचरा वर्गीकरण, घरोघरी जाऊन प्रचार करणे, पथनाटय़ बसवणे, त्याला संगीत देणे अशा स्वरूपाचे काम ते करतील.

नवी मुंबई शहराला स्वच्छतेसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तरीही स्वच्छतेसाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याची गरज आहे. शंकर महादेवन यांच्या ब्रँडिंगमुळे स्वच्छतेचा संदेश पोहोचवण्यास मदत होईल.

तुकाराम मुंढे,, महापालिका आयुक्त