शहरात १८ हजार मतदार; संपर्क मोहिमांना जोर

नवी मुंबई कोकण पदवीधर मतदारसंघाच्या सोमवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेनेची मदार नवी मुंबईतील पदवीधर मतदारांवर आहे. एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या शहरातील पदवीधर मतदार शोधून काढण्याची मोहीम शिवसेनेने हाती घेतली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी संपर्क साधण्यात आला आहे.

हा मतदारसंघ भाजपचा मानला जात आहे. भाजपच्या हातून तो खेचून आणण्यासाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत संपर्क मोहीम सुरू केली आहे.

राज्यात शिवसेना, भाजप या मित्रपक्षांत सध्या विस्तवही जात नाही. पालघर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकल्याने ही दुही अधिक चर्चेत आली. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या सोमवारी होणाऱ्या निवडणुकीत एकूण १४ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत ही भाजपचे निरंजन डावखरे आणि शिवसेनेचे संजय मोरे यांच्यात होणार असल्याचे स्पष्ट दिसते.

राष्ट्रवादीच्या नजीब मुल्ला यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी दिल्याने त्यांची म्हणावी तशी तयारी केलेली नाही. त्यात त्यांची प्रतिमा मलिन झाल्याने पदवीधर मतदार त्यांच्याकडे किती वळेल याबद्दल शंका व्यक्त होत आहे. शिवसेनेने या निवडणुकीत प्रथमच उमेदवार उभा केल्याने ही लढत चुरशीची झाली आहे.

एकूण एक लाख चार हजार मतदारांपैकी नवी मुंबईत १८ हजार मतदार असून हा मतदार आपल्याकडे वळविण्यासाठी तिन्ही प्रमुख पक्षांनी कंबर कसली आहे. शिवसेनने येथील प्रत्येक पदाधिकाऱ्याला कामाला लावले असून पदवीधर मतदारांशी संपर्क साधण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

यात राष्ट्रवादीच्या नेत्यांची सेनेला मदत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २९ गावांत प्रकल्पग्रस्त पदवीधर मतदार मोठय़ा प्रमाणात आहेत. त्यांच्याशीही शिवसेनच्या वतीने संपर्क साधला जात असून भाजपच्या पदरात सहज पडणारा हा मतदारसंघ राखणे या वेळी त्यांच्यासाठी जिकिरीचे झाले आहे.

मतदानाच्या कालावधीत वाढ

’ कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सोमवारी होत असून मतमोजणी २८ जूनला नेरुळ येथील आगरी कोळी भवनात होणार असल्याचे कोकण विभागिय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

’ निरीक्षक म्हणून दुग्ध विकास आयुक्त आर. आर. जाधव काम पाहणार आहेत. सर्व उमेदवारांना परवानग्या घेण्यासाठी एक खिडकी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

पनवेलमध्ये चार हजार ९१७ मतदार

पनवेल : मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका २५ जूनला होणार असून जिल्ह्य़ातील ३४ मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते दुपारी ४ दरम्यान मतदान होणार आहेत. पनवेलमध्ये पदवीधर मतदारसंघात चार हजार ९१७ मतदार आहेत.

रायगड जिल्ह्य़ात एकूण १७ हजार ७६९ मतदार आहेत. यामध्ये पुरुषांची संख्या १० हजार ५७७ असून सात हजार १९२ महिला मतदारांचा समावेश आहे. पनवेल तालुक्यातील मतदान हे सरस्वती विद्यामंदिर येथे पार पडणार असून तेथे नऊ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत, अशी माहिती पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे यांनी दिली.

पनवेल ग्रामीण, पनवेल शहर, खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल, तळोजा, नावडे या परिसरातील पदवीधर मतदारांचा समावेश पनवेल पदवीधर मतदारसंघात आहे. मतदारांची संख्या मोठी असल्याने पनवेल तालुका हा राजकीय दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला, शिवसेनेचे संजय मोरे यांच्या समर्थकांनी मोर्चेबांधणी केली आहे.