नवी मुंबईत बेकायदा बांधकामप्रकरणी बडे नेते, नगरसेवक अडचणीत

बेकायदा बांधकामात सहभाग असल्याच्या तक्रारींमुळे नवी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महापौरपदावर आरूढ होऊन सत्ता हस्तगत करण्याचे स्वप्न रंगविणारी शिवसेना या एरवी परस्पर विरोधी पक्षातील काही बडे नगरसेवक अडचणीत सापडले असून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या प्रकरणांचा वेगाने निपटारा सुरू केल्याने राजकीय व्यवस्थेतील अस्वस्थतेने टोक गाठल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीच्या दिघा येथील तिघा नगरसेवकांचे पद रद्द करण्याचे आदेश मुंढे यांनी दोन महिन्यांपूर्वी काढले. त्यापाठोपाठ शिवसेनेचे मातब्बर नगरसेवक आणि विद्यमान स्थायी समिती सभापती शिवराम पाटील यांच्या पदाविषयी येत्या आठ दिवसांत निर्णय अपेक्षित आहे. तो विरोधात गेल्यास महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्याही शिवसेनेच्या हातून निसटण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच मुंढेविरोधी मोहिमेत शिवसेना नेत्यांनी राष्ट्रवादीसोबत उघड हातमिळवणी केल्याची चर्चा रंगली आहे.

महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बेकायदा बांधकामे तसेच जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारींमुळे तब्बल १५ नगरसेवक मुंढे यांच्या ‘रडार’वर आले आहेत. त्यांपैकी दिघा येथील तिघांचे नगरसेवकपद रद्द करण्याचे आदेश मुंढे यांनी यापूर्वीच काढले आहेत, तर स्थायी समिती सभापती शिवराम पाटील आणि त्यांच्या नगरसेविका पत्नी अनिता पाटील यांच्या प्रकरणात सुनावणी पूर्ण करण्यात आली आहे. कोपरखैरणे येथील एका बेकायदा हॉटेलच्या उभारणीत पाटील पती-पत्नींचा सहभाग असल्याच्या तक्रारी आहेत. येत्या आठ दिवसांत या दोघांसंबंधी निकाल अपेक्षित असून तो विरोधात गेल्यास पालिकेतील राजकारणात शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत. शिवाय स्थायी समितीवरील या पक्षाची पकडही त्यामुळे ढिली होणार आहे.

काही महिन्यांपूर्वी एका काँग्रेस नगरसेविकेला गळाला लावत महापालिकेच्या स्थायी समितीवर शिवसेनेचे शिवराम पाटील सभापती म्हणून निवडून आले होते. दोन हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या या महापालिकेत महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचा तर स्थायी समितीवर शिवसेनेची पकड असल्याची विचित्र राजकीय स्थिती आहे. महापालिकेतील सत्तेवर पकड मिळविण्यासाठी या दोन्ही पक्षांमध्ये एरवी कमालीची चुरस असते. परंतु नगरसेवकांवर एकामागोमाग एक गंडांतर येऊ लागल्याने हे दोन्ही पक्ष मुंढे यांच्याविरोधातील मोहिमेत एकवटल्याचे चित्र आहे.

शिवसेना-राष्ट्रवादीच्या अडचणींत वाढ

बेकायदा बांधकाम प्रकरणात सहभाग असल्याच्या तक्रारींवरून सध्या जगदीश गवते, शुभांगी गवते, आकाश मढवी, राजू कांबळे, बहादूर बिस्ट (सर्व शिवसेना), मुनावर पटेल, सुरेश कुलकर्णी, राधा कुलकर्णी (सर्व राष्ट्रवादी), तसेच उषा कृष्णा पाटील (भाजप) हे अन्य नगरसेवकही अडचणीत आले आहेत. या सर्वाना पालिका प्रशासनाने नोटीस बजावल्याने नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. या सर्व नगरसेवकांनी आपल्याविरोधातील तक्रारींचे खंडन केले असले, तरी सुनावणीची प्रकिया सुरू झाल्याने येथील राजकीय व्यवस्थेला तो मोठा हादरा मानला जात आहे.

शिवराम पाटील यांच्या नगरसेवकपदासंबंधी अंतिम निर्णय झालेला नाही. त्यांचे पद धोक्यात आले आहे हे म्हणणे चूक आहे. स्थायी समितीमधील राजकीय गणितांमुळे शिवसेना अविश्वास ठरावात सहभागी झाल्याच्या म्हणण्यातही तथ्य नाही. बेकायदा बांधकामांमुळे नगरसेवकांवर  टांगती तलवार असल्यामुळे आम्ही आक्रमक झाल्याचा तर्क हास्यास्पद आहे.  – विजय चौगुले, शिवसेना नेते