तपासणीसाठी प्रलंबित अहवाल आठ हजारांहून अधिक; रुग्णसंख्येतील घसरण फसवी असल्याची शंका

नवी मुंबई : प्राणवायूची कमतरता, रेमडेसिविरचा तुटवडा, खाटांचा पेच अशा विविध कारणांमुळे तणावात असलेल्या नवी मुंबईतील आरोग्य व्यवस्थेला गेल्या काही दिवसांपासून घटत्या रुग्णसंख्येने दिलासा दिला आहे. गेल्या तीन दिवसांत शहरातील दैनंदिन करोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट होत असून सोमवारी ४५५ नवीन रुग्णांची नोंद झाली. दुसरीकडे शहरात दररोज तपासणीसाठी प्रलंबित राहणाऱ्या नमुन्यांची संख्या आठ हजारांवर गेल्याने साशंकता निर्माण झाली आहे. संशयित रुग्णांचे अहवाल येण्यास होत असलेल्या विलंबामुळे रुग्णसंख्येत घट दिसत असल्याची चर्चा सुरू आहे.

मार्च महिन्यापासून नवी मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असून एप्रिलमध्ये दररोज एक हजारहून अधिक करोनाबाधित आढळून येत होते. पाच एप्रिल रोजी शहरात १४४१ रुग्णांची नोंद झाली. मात्र, गेल्या आठवडाभरापासून दररोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. गेले तीन दिवस तर रुणसंख्या सहाशेच्या घरात आली असून सोमवारी ४५५ रुग्णांची नोंद झाली. या तुलनेत दररोज उपचारांनंतर करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने एक हजारहून अधिक आहे. त्यामुळे शहरातील करोना संसर्ग आटोक्यात येत असल्याची चर्चा आहे. मात्र, तपासणीसाठी प्रलंबित अहवालाची संख्या आठ हजारांहून अधिक असल्याने सध्याची रुग्णसंख्येतील घट ही फसवी नाही ना, अशी शंका व्यक्त होत आहे.

नवी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दररोज सरासरी नऊ हजार चाचण्या केल्या जात आहेत. नवी मुंबई शहरात पालिकेने शहरात पालिकेच्या सर्व रुग्णालयांसह, नागरी आरोग्य केंद्र, रेल्वे स्टेशन अशा जवळजवळ ५० ठिकाणी चाचणी केंद्रे असून शहरात जवळजवळ १५ खासगी प्रयोगशाळांमधून करोना चाचणी केली जात आहे. शहरात दिवसाला पालिका ३ हजार चाचण्या, खासगी प्रयोगशाळांमधून ३ हजार चाचण्या तसेच पालिकेमार्फत ३ हजार प्रतिजन चाचण्या अशा सरासरी ९ ते १० हजार चाचण्या केल्या जातात. दैनंदिन चाचण्यांचे प्रमाण अधिक असले तरी, दररोज हाती येणाऱ्या अहवालांची संख्या कमी आहे. अहवाल येण्यास दोन दिवसांहूनही अधिक विलंब होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. अहवाल विलंबाने येत असल्याने दररोज आढळणारी रुग्णसंख्या कमी येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्याच वेळी अहवालांना विलंब होत असल्यामुळे संशयित रुग्णांकडून अन्य काही नागरिकांना करोना प्रसार होण्याची भीती व्यक्त होत आहे.

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनीही अहवाल प्रलंबित राहात असल्याची बाब मान्य केली. खासगी प्रयोगशाळांना २४ तासांत अहवाल देणे बंधनकारक करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अहवाल देण्यास विलंब केल्याबद्दल एका प्रयोगशाळेला नोटीस बजावण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच अहवाल वेळेत प्राप्त होतील, याकरिता काळजी घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

दैनंदिन करोना रुग्णसंख्या

* १३ एप्रिल- १०३४

* १४ एप्रिल- ११०९

* १५ एप्रिल-१०३६

* १६ एप्रिल-१०१७

* १८ एप्रिल-८२१

* १९ एप्रिल- ७५५

* २० एप्रिल-८६०

* २१ एप्रिल-८४०

* २२ एप्रिल-८०९

* २३ एप्रिल- ६७५

* २४ एप्रिल-५८०

* २५ एप्रिल-५४४

३०,३१७   महिनाभरात करोना रुग्णांची वाढ

शहरातील दैनंदिन चाचण्या

            प्रलंबित चाचण्या       अहवाल

बुधवार        ७६९२                 ५४३२

गुरुवार       ७५४३                  ५९९१

शुक्रवार         ७५०८                ८०४१

शनिवार       ६६२४                 ९०८५

रविवार       ७५०८                   ८७४३