एकाच ‘पीपीई’च्या खर्चाची विविध रुग्णांकडून वेगवेगळ्या किमतींत वसुली

शेखर हंप्रस, लोकसत्ता

नवी मुंबई : कोरोना विषाणू हा रोग नसून पैसे कमावण्याचे साधन असल्याची भावना ठेवत बहुतेक खासगी रुग्णालयांनी नागरिकांची लूट सुरूच ठेवल्याचे आजवरच्या अनेक तक्रारींवरून स्पष्ट झाले आहे. यातील सर्वात धक्कादाय बाब म्हणजे, अनेक रुग्णांची तपासणी करताना उपयोगात आणलेल्या एकाच ‘पीपीई’चा (व्यक्तिगत सुरक्षा साधन) खर्च सर्व रुग्णांकडून वेगवेगळ्या किमतींत आणि मूळ किमतीहून चौपट ते पाचपट दराने वसूल केला जात असल्याचे उजेडात आले आहे.

रुग्णांना सामावून घेण्याची पालिका रुग्णालयांची क्षमता संपुष्टात आली आहे. त्यामुळे अशा अतिरिक्त रुग्णांना दाखल करण्यासाठी खासगी रुग्णालयात खाटा घेण्यात आल्या आहेत. खासगी रुग्णालयात बाधितांवर उपचार करण्याची मुभा सरकारने दिली आहे. यात खासगी रुग्णालयांनी रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे छापण्याची ‘सेवा’ कायम ठेवली आहे. करोनावर अद्याप कोणतेही औषध आलेले नाही. तरीही खासगी रुग्णालयात अशा नेमक्या कोणत्या औषधोपचारांसाठी पैसा खर्च केला जातो, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून पैसे उकळण्यासाठी ‘पीपीई’ खरेदीचा मार्ग स्वीकारला आहे. एक ‘पीपीई’ साधारण ७०० ते १ हजार रुपयांना खरेदी केले जाते. तर काही ठिकाणी दोन हजार रुपयांचे ‘पीपीई’ वापरले जात आहेत. हा खर्च रुग्णांकडून वसूल केला जात आहे. मात्र खासगी रुग्णालयात डॉक्टर एकच ‘पीपीई’ घालून सहा तास काम करतात. यात किमान २० रुग्णांची तपासणी केली जाते.

खासगी रुग्णालयांनी एका ‘पीपीई’चा खर्च २० रुग्णांकडून वसूल करणे अपेक्षित आहे. मात्र एका ‘पीपीई’चा खर्च रुग्णांना दिल्या जाणाऱ्या देयकांमध्ये वेगवेगळ्या रकमा टाकून वसूल केला जात आहे. यात रुग्णांकडून १ ते ४ हजार रुपये असे शुल्क आकारले जात आहे. ही लूट एवढय़ावरच थांबलेली नाही. ‘पीपीई’सोबत मुखपट्टी आणि हातमोजे मिळत असतात. मात्र, रुग्णालय प्रशासन प्रत्येक रुग्णाकडून मुखपट्टी, हातमोज्यांसाठीची रक्कम वसूल करीत असल्याचे उघड झाले आहे. यासाठी किमान ५०० रुपये खर्च देयकात घुसडला जात आहे. विशेष म्हणजे एका ‘पीपीई’सोबत असलेली मुखपट्टी आणि हातमोजे ही साधने १५ ते २० रुग्ण तपासण्यासाठी वापरले जात आहे. हा सारा प्रकार खासगी रुग्णालयातील करोना विभागात काम करणाऱ्या डॉक्टरने उघड केला आहे. खासगी रुग्णालय व्यवस्थापन पैसे उकळण्यासाठी हे सारे प्रकार करीत असले तरी त्यामुळे डॉक्टरी पेशा बदनाम होत असल्याची खंत या डॉक्टरने ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केली. तुमच्याकडे भरपूर पैसा असल्यासच खासगी रुग्णालयाची पायरी चढा, असा सल्ला या अनुभवातून आलेल्या विद्याधर गोस्वामी यांनी दिला. याबाबत अनेक प्रतिष्ठित रुग्णालय प्रतिनिधींशी बोलून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणाचीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

कोरोना विषाणूवर औषध नसूनही रोज ८० ते ९० हजार रुपयांपर्यत देयक रुग्णांच्या नातेवाईकांच्या हाती का दिले जात आहे, हे कोडेच आहे. याबाबत खासगी रुग्णालय व्यवस्थापनाला धारेवर धरल्यावर अनेकांची देयके माफ करण्यात आली आहेत.

– गजानन काळे, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष मनसे

‘पीपीपी’चे पैसे रुग्णाकडून अशा पद्धतीने वसूल होत असतील तर ते गैर आहे. याबाबत तक्रार आल्यास त्याची योग्य ती दखल घेऊन कारवाई केली जाईल.

– डॉ. बाळासाहेब सोनावणे, वैद्यकीय अधिकारी नवी मुंबई पालिका