विकास महाडिक

‘स्मार्ट वॉच’ला डॉक्टरांचा नकार; वेतन रोखण्याचा प्रशासनाचा इशारा

पालिकेचा प्रत्येक कर्मचारी अधिकारी कुठे आहे, काय करीत आहे, कामावर किती वाजता आला, किती वाजता गेला, नेमून दिलेले काम करीत आहे का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देणारे एक स्मार्ट वॉच मनगटावर चढविण्यास पालिकेच्या वाशी येथील डॉक्टरांनी स्पष्ट नकार दिला आहे. साफसफाई कामगारांवर देखरेख ठेवणारे हे घडय़ाळ आम्हाला घालण्यास बंधनकारक करून प्रशासन आमचा अपमान करीत असल्याचा या डॉक्टरांचा कांगावा आहे. शहरातील चर्तुथ श्रेणी कामगारांवर नजर ठेवण्यापेक्षा गलेलठ्ठ वेतन घेऊन कामचुकारपणा करणारे डॉक्टर आणि मास्तर यांच्यावर हा प्रयोग पहिल्यांदा करण्याचा निर्णय पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी घेतला आहे. त्यामुळे या घटकांचे धाबे दणाणले आहेत.

नागपूर पालिकेत स्मार्ट वॉच प्रणाली अमलात आणली गेली आहे. नवी मुंबई पालिकेने या प्रणालीचे अनुकरण करण्याचे ठरविले आहे. पालिकेच्या कायम स्वरूपी कर्मचारी अधिकाऱ्यांची संख्या २२०० पर्यंत असून ठोक पगारावर ८०० कर्मचारी आहेत. याशिवाय शहरातील सर्व घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी लिलया सांभाळणारे नऊ हजार कंत्राटी साफसफाई कामगार आहेत. असे एकूण बारा हजार कर्मचारी व अधिकारी पालिका सेवेत कार्यरत असून या सर्वावर कामाच्या वेळत नजर ठेवणारे घडय़ाळ एका खासगी संस्थेने विकसित केले आहे.

कर्मचारी, अधिकारी, कामावर किती वाजता आला, कामावरून किती वाजता गेला, त्याने काम किती केले, कामाचे क्षेत्र सोडून तो किती वेळ बाहेर गेला, अशा अनेक छोटय़ा-मोठय़ा प्रश्नांची उत्तरे या घडय़ाळाद्वारे मुख्यालयात तयार करण्यात येणाऱ्या नियंत्रण केंद्राला कळणार आहेत. विशेष म्हणजे या कर्मचारी अधिकाऱ्यांची तबियत खराब झाली अथवा त्याला अशक्तपणा आला तर त्याची माहिती देखील हे घडय़ाळ काही क्षणात मुख्य नियंत्रण केंद्राला कळविणार आहे. त्यामुळे सर्व हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या या घडय़ाळाची एक साथसोबत देखील मिळणार आहे.

बेलापूर विभागातील दोनशे कर्मचारी अधिकाऱ्यांनी हे स्मार्ट वॉच मनगटावर चढविले आहे. उच्च अधिकाऱ्यांपासून ते शिपायापर्यंत सर्वानीच हे स्मार्ट वॉच बांधावे, असा पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी यांचा आग्रह आहे. याची सुरुवात साफसफाई कामगारांपासून सुरू करणे योग्य आहे पण त्यापेक्षा शहरातील सर्वात महत्त्वाचे विभाग असलेल्या आरोग्य आणि शिक्षण विभागासाठी हे घडय़ाळ अत्यावश्यक आहे, अशी सूचना काही उच्च अधिकाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे आयुक्तांनी ही सुरुवात वाशी येथील पालिकेच्या मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टरांपासून करण्याचा निर्णय घेतला आहे. या रुग्णालयातील अनेक डॉक्टर हे पालिकेचे वेतन तर घेतातच, पण याशिवाय बाहेर प्रॅक्टिस देखील करीत असल्याच्या तक्रारी आहेत. काही डॉक्टरांचे इतर धंदे असून रुग्णालयाच्या सेवेत कमी आणि बाहेर जास्त, अशी या डॉक्टरांची काम करण्याची पद्धत आहे. या डॉक्टरांचे वेतन मुंबई अथवा ठाणे पालिका रुग्णालयापेक्षा कमी असल्याने आयुक्तांनी तो वाढविला आहे. तरीही या डॉक्टरांची वरकमाई करण्याची सवय जात नाही. त्यामुळे घडय़ाळाचा पहिला प्रयोग हा या डॉक्टरांवर करण्यात यावा असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याला वाशी रुग्णालयातील ९० टक्के डॉक्टरांनी विरोध केला आहे. यासाठी त्यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली पण आयुक्त आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. रुग्णालयातील नर्सेस, वॉर्ड बॉय आणि इतर चर्तुथ श्रेणी कर्मचाऱ्यांवर हा प्रयोग न करता थेट आमच्या कामावर हा अविश्वास दाखवत असल्याने हा आमचा अपमान असल्याचा कांगावा या डॉक्टरांनी केला आहे. त्याला प्रशासनानेही तसेच उत्तर देण्याचे ठरविले आहे.

पगार कमी आहे म्हणून सातत्याने तक्रारी करणाऱ्या डॉक्टरांनी ही कार्यप्रणाली देखील आत्मसात करण्यास पुढाकार घ्यावा, अशी समज देण्यात आली आहे. जे डॉक्टर हे घडय़ाळ बांधण्यास नकार देतील त्यांचे वेतन थांबविले जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत.

पर्यायी डॉक्टर नेमण्याची तयारी

या घडय़ाळामुळे नोकरी सोडणाऱ्या डॉक्टरांना पर्यायी डॉक्टर नेमण्याची तयारी देखील प्रशासनाने ठेवली आहे. शाळेत हजेरी लावून इतरत्र भटकणाऱ्या मास्तरांना यानंतर या घडय़ाळाचा चाप लावणार आहे.

पालिका प्रशासनाने घेतलेला निर्णय सर्वाना बंधनकारक आहे. त्यामुळे त्यात उच्च अधिकाऱ्यापासून ते शिपायापर्यंत सर्वच सहभागी होणार आहेत. जे हे घडय़ाळ बांधण्यास नकार देतील त्यांचे वेतन रोखले जाणार आहे.

-महावीर पेंढारी, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई पालिका