चटपटीत मसालेदार काबुली चण्यांपासून बनवलेली करी आणि मैद्याच्या कणीकपासून हाताच्या तळव्याच्या आकारात गोलाकार थापून तळलेले गरमागरम भटुरे. त्यासोबत चवीला बटाटय़ाची भाजी, कांदा, तळलेली मिरची आणि लोणच्याची साथ. अस्सल पंजाबी चवीचा आस्वाद घेण्याची सोय सबलोक या नेरुळमधील छोटेखानी टपरीरूपी असलेल्या दुकानात होत आहे. प्रवीण दा धाबा म्हणून या ठिकाणाची ओळख परिचित लोक करून देतात.

छोले भटुरे ही मसालेदार, दमखम खाद्यपदार्थ पंजाब, दिल्ली या ठिकाणी सर्रास उपलब्ध असतो. आपल्या गावाकडील अस्सल पंजाबी स्वाद मुंबईकरांना देण्याचा प्रयत्न नेरुळमध्ये गेल्या १६ वर्षांपासून प्रवीण कुमार सबलोक करत आहेत. मूळचे दिल्लीचे असलेले असलेले सबलोक यांनी १९७९ साली मुंबई गाठली. ५ वी इयत्तेपर्यंतचे जेमतेम शिक्षण. मुंबईविषयी आकर्षण असल्याने मुंबईत स्थायिक होण्याचा विचार पक्का झाला. गावी छोले भटुरेचा खानदानी व्यवसाय असल्याने पाकशास्त्राचे जुजबी ज्ञान होते. सायन कोळीवाडा परिसरात कॅटर्सच्या हाताखाली कामे केली. परिसरातील लोकवस्ती पंजाबी असल्याने पंजाबी पदार्थ उत्तमरीत्या बनविण्याच्या कौशल्यात सराईत झाले. परिस्थिती सुधारण्याचे चिन्ह दिसेना, त्यामुळे नंतर गुजरात येथे एका नामांकित कंपनीत काम केले. मेळ काही बसेना. नोकरी सोडून पुन्हा नवी मुंबई गाठली. २००२ पासून नेरुळ येथे पंजाबी खाद्यपदार्थ बनविण्याचा व्यवसाय चालू केला. पंजाबी स्पेशल छोले भटुरे म्हणून परिसरात हे प्रसिद्ध आहे. छोलेचा रस्सा हा छोले भटुरेची खासियत ठरवत असतो. यासाठी वापरला जाणारा चना मसाला (गरम मसाला) हा घरगुती स्वरूपातील स्वत: बनवला जातो. यासाठी वापरले जाणारे काबुली चणे, बटाटा हे पंजाबवरून मागविले जातात. रोज ५ किलो चणे, १० किलो मैदा अशी सामग्री लागते. मुलगा व बायको कामात हातभार लावत असल्याचे सबलोक सांगतात. याशिवाय मूगडाळ भजी, डाळ पक्वान्न, दिल्ली पॅटिस, छोले पॅटिस, पंजाबी चायनीज आणि चहाही येथे मिळतो. किंमतही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी असल्याने ग्राहकांची गर्दी असते. रेल्वेस्थानक, बसस्थानकाजवळचा भाग याशिवाय सकाळी घराबाहेर पडलेल्यांची भरपेट नाश्ता म्हणून छोले भटुरेला पसंती मिळते.

सबलोक कॅटर्स

  • कुठे- सबलोक कॅटर्स, सेक्टर १५ च्या बसस्थानकाच्या विरुद्ध बाजूला, नेरुळ.
  • कधी- सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत