15 December 2017

News Flash

नवी मुंबईत २००० वाहनांचे पार्किंग

कोंडीची समस्या न उद्भवता आणि कोणतीही अनुचित घटना न घडता,मोर्चा मुंबईत रवाना झाला.

वार्ताहर, नवी मुंबई | Updated: August 10, 2017 1:42 AM

वाशी येथील कृषी उत्पन्न बाजारात शेकडो वाहने पार्क करण्यात आली होती.

कोंडी टाळण्यात वाहतूक विभाग, पोलिसांना यश

राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा मूक मोर्चासाठी मुंबईत आलेल्या मोर्चेकऱ्यांसाठी नवी मुंबईने भल्या मोठय़ा वाहनतळाची भूमिका बजावली. शहरातील विविध रेल्वे स्थानके, वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार आणि अन्य लहान-मोठय़ा मैदानांत पार्किंगची सोय करण्यात आली होती. नवी मुंबईतच वाहने पार्क करण्याचे आणि रेल्वेने मुंबईला जाण्याचे आवाहन अन्य जिल्ह्य़ांतून आलेल्या मोर्चेकऱ्यांना करण्यात आल्यामुळे रस्त्यांवरील भार काहीसा हलका झाला. पार्किंगची योग्य व्यवस्था, पोलीस व वाहतूक विभागाचे अचूक नियोजन आणि मोर्चेकऱ्यांची शिस्तबद्धता यामुळे कोंडीची समस्या न उद्भवता आणि कोणतीही अनुचित घटना न घडता,मोर्चा मुंबईत रवाना झाला. पनवेलसह मानसरोवर, खांदेश्वर, कामोठे, खारघर, सीवूड्स, नेरुळ, वाशी, सानपाडा, एपीएमसी बाजार या ठिकाणी वाहने पार्क करण्यात आली होती. पुणे व सोलापूर या जिल्ह्यांतून येणाऱ्यांची सोय खारघरमधील सेंट्रल पार्कमध्ये आणि खारघर रेल्वे स्थानकात करण्यात आली होती. सेंट्रल पार्क येथे २० वाहने तर इतर रेल्वे स्थानकांत ४०० छोटी वाहने पार्क करण्यात आली होती. सातारा, सांगली, कोल्हापूरवरून येणाऱ्यांची सोय वाशीच्या एपीएमसी बाजारात करण्यात आली होती. कांदा-बटाटा बाजारात ५०० तर मसाला बाजारात १०० वाहने पार्क करण्यात आली होती. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गतील वाहनांची सोय ही सीवुड्स, नेरुळ, तांडेल मैदानात करण्यात आली होती. तांडेल मैदानात ४० बस, ४५ कार, तर आगरी कोळी भावन येथे  ४० बस, ४५ कार तसेच तेरणा मेडिकल कॉलेजमध्ये २५० वाहने पार्क करण्यात आली होती. अहमदनगर येथील एक बस खांदेश्वर येथे पार्क केली होती. औरंगाबाद येथील २ बस, ५ ट्रक, १९० कार मानसरोवर रेल्वे स्थानकात उभ्या करण्यात आल्या होत्या. बीडमधील वाहने सानपाडा येथे पार्क केली होती. वाशीत परभणी येथील महाराष्ट्र सदनाच्या परिसरात ४ बस, १६ कार अशी २० वाहने पार्क केली होती. त्याव्यतिरिक्त भारती विद्यापीठ कॅम्पसमध्ये ६ बस, ४ टेम्पो आणि २६५ कार उभ्या करण्यात आल्या होत्या. पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर १२ कार आणि ७ दुचाकी पार्क करण्यात आल्या होत्या.

मुंबईतील मराठा मोर्चाची खरी भिस्त होती ती नवी मुंबईतील पोलिसांवर आणि वाहतूक विभागावर. एवढय़ा प्रचंड जनसमुदायाला सुरक्षित राखण्याची आणि त्याचे नियमन करण्याची कसरत या दोन्ही विभागांनी सक्षमपणे पार पाडली. शिस्तबद्ध आंदोलनकर्त्यांमुळे त्यांचे काम सोपे झाले. वाहतूक कोंडी टाळण्यात वाहतूक पोलीस यशस्वी झाले. डीसीपी-३ , एसीपी-३, पीआय-४३, पीएसआय-१२९, कर्मचारी-१३५७ आणि वाहतूक पोलीस मिळून एकूण १५३८ अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोर्चाची चोख व्यवस्था ठेवली.

ड्रोनचा वापर झालाच नाही

खारघर टोलनाक्याजवळ पोलिसांनी वाहतूक कोंडीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याची व्यवस्था केली होती; मात्र मोर्चेकऱ्यांनी हुल्लडबाजी न केल्यामुळे कोंडीचे प्रकार झालेच नाहीत आणि ड्रोनची मदतही लागली नाही.

राज्याच्या कानाकोपऱ्यांतून शहरात हजारो वाहने व मोर्चेकरी आले होते. परंतु कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी झाली नाही. रात्री उशिरापर्यंत चोख व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे कोणतीच अडचण निर्माण झाली नाही. मोर्चेकरीही शिस्तीचे पालन करत होते.

नितीन पवार, उपायुक्त, वाहतूक विभाग

First Published on August 10, 2017 1:42 am

Web Title: successful parking facilities to maratha morcha