पालिकेकडून खाटांसह अतिदक्षता कक्षाची युद्धपातळीवर व्यवस्था

नवी मुंबई : गेला आठवडाभर चारशेच्या आत करोनाबाधित रुग्णांची संख्या आढळून येणाऱ्या नवी मुंबईत येत्या काळात कल्याण-डोंबिवलीप्रमाणे दुसरी करोना लाट येण्याची शक्यता पालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पालिका वर्तुळात चिंतेचे वातावरण असून पालिकेने काळजी केंद्र, प्राणवायू पुरवठा कक्ष आणि अतिदक्षता कक्षाची युद्धपातळीवर व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे.

नवी मुंबई पालिका क्षेत्रातील करोना रुग्णांची संख्या तीस हजारांच्या वर गेली आहे. यातील उपचार घेत असलेले रुग्ण हे चार हजारांच्या घरात असल्याने पालिका अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात दुसरी करोना लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. नवी मुंबई पालिका क्षेत्रात मागील एक आठवडाभर कमीत कमी २६५ ते जास्तीत जास्त ३९० रुग्णसंख्या दिवसाला आढळून आली आहे. पालिकेने आरटीपीसीआर व प्रतिजन चाचण्या मोठय़ा प्रमाणात वाढविल्याने ही रुग्णसंख्या जास्त असल्याचे दिसून येत आहे. मात्र ही संख्या चारशे रुग्णांच्या आत रोखण्यात पालिकेला यश आले आहे. करोना रुग्णांची संख्या मर्यादित ठेवताना मृत्युदर कमी राखण्याचा प्रयत्न पालिका करीत आहे. मात्र त्याला म्हणावे तसे यश येताना दिसत नाही. दोन दिवसांपूर्वी सहा रुग्ण दगावल्याची नोंद आहे. टाळेबंदी शिथिल करण्यात आल्याने नवी मुंबईत नागरिकांचा संचार वाढला असून अनेक जण मुखपट्टी, सुरक्षित अंतर, आणि सातत्याने हात धुणे यांसारख्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महिनाअखेर या शहरात पुन्हा करोना रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात आढळून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चारशेपर्यंत रोखण्यात आलेली रुग्णसंख्या हा आकडा पार करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वाढती रुग्णसंख्या

* ८ सप्टेंबर २६५

* ९ सप्टेंबर  ३५५

* १०सप्टेंबर  ३९०

* ११ सप्टेंबर  ३५९

* १२ सप्टेंबर  ३८१

* १३ सप्टेंबर  ३६८

* १४ सप्टेंबर  ३४२